आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘अल निनो’मुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने राज्यातील महापालिकांनी आतापासूनच पाणी बचतीचे धोरण स्वीकारले आहे. उन्हाळा सुरू होताच अनेक महापालिकांनी पाणीपुरवठ्यात कपातीची तयारी सुरू केली आहे. मात्र, नागरिकांना पाच दिवसांआड पाणी पुरवणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सध्याच्या वितरण वेळापत्रकात काहीही बदल न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शहरात उन्हाळ्यातही पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
सध्या शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. जलवाहिनी फुटणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा कारणांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. परिणामी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडते व नागरिकांना पाचऐवजी सात ते आठ दिवसांआड पाणी मिळते. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यामुळे पाणी कपात करण्याची चर्चा होत आहे. ऐन उन्हाळ्यात शहरातही पाणी कपात राबवली जाणार का? असे पत्रकारांनी डॉ. चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातच वारंवार व्यत्यय येऊन नियोजन विस्कळीत होत आहे.
पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न आहे. जायकवाडीतून उपसा करण्यात येत असलेल्या व शहरात वितरित केल्या जात असलेल्या पाण्याच्या प्रमाणात बरीच तफावत आहे. ती दूर करून पाणीपुरवठ्यात सुधारणा घडवून आणली जात आहे. हर्सूल तलावाचे पाणीही घेण्यात येत आहे. पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येईल. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.’
‘अल निनो’मुळे मनपांचा निर्णय या वर्षी ‘अल निनो’मुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे इतर महापालिकांनी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या वर्षी जायकवाडीसह हर्सूल तलावातही पाण्याचा पुरेसा साठा असल्यामुळे मनपाने पाणीपुरवठ्यात कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. जायकवाडीत सुमारे ६२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
तीन जलकुंभांसाठी तयारी सुरू ऐन उन्हाळ्यात शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेला मार्चअखेरपर्यंत दहा जलकुंभ ताब्यात देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सात दिले जातील असेही सांगण्यात आले. त्यानंतर पाच जलकुंभ देण्याचे नियोजन असल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी विभागीय आयुक्तांच्या आढावा बैठकीत सांगितले. परंतु, जलकुंभाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत हिमायतबाग, टीव्ही सेटर, हनुमाननगर हे तीन जलकुंभ मनपाच्या ताब्यात मिळणार आहेत.
नळांना मीटर बसवण्याचे काम सुरू शहरातील व्यावसायिक नळांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीप्रमाणे जास्त व्यासाच्या व्यावसायिक नळांना मीटर बसवण्याची कार्यवाही सुरू केली जाईल. मनपाकडे पाच हजार व्यावसायिक मीटर उपलब्ध असून लवकरच ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील नो-नेटवर्क एरियामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा मागवल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.