आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असून अडचण नसून खोळंबा:लस साठवण्यासाठी केंद्राने पाठवलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये बर्फासोबत होतेय पाणी

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हेंटिलेटरनंतर आता आइस लाइंड रेफ्रिजरेटरमध्ये बिघाड

केंद्र शासनाकडून पुरवठा झालेल्या व्हेंटिलेटरच्या नादुरुस्तीबाबत मोठा गाजावाजा झाल्यानंतर आता लस साठवण्यासाठी पुरवठा करण्यात आलेल्या आइस लाइंड रेफ्रिजरेटरमध्ये बर्फासोबत पाणी होऊ लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात ही परिस्थिती असून यामुळे लस साठवण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठवून माहितीही दिली आहे.

राज्यात कोविडमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांना गरज भासल्यास तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाकडून व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याचे दिसून आले. हिंगोली येथे आमदार सतीश चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयाकडून व्हेंटिलेटरबाबत लेखी माहिती विचारली होती. त्यात सर्व व्हेंटिलेटर सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काही वेळातच आमदार चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केल्यानंतर सर्व १५ व्हेंटिलेटर एका खोलीत पडून असल्याचे दिसून आले. त्यानंतर व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यात आले होते.

दरम्यान, व्हेंटिलेटरपाठोपाठ केंद्र शासनाकडून दोन महिन्यांपूर्वीच आइस लाइंड रेफ्रिजरेटरचा (आयएलआर) पुरवठा केला आहे. यामध्ये लस साठवणुकीसाठी लागणारे २ ते ८ डिग्री तापमान कायम ठेवता येते. त्यामुळे यामध्ये लस साठवणूक केली जाते. केंद्राकडून हिंगोली जिल्ह्यात लहान पाच, तर मोठे पाच रेफ्रिजरेटर प्राप्त झाले आहेत. हे रेफ्रिजरेटर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांकडे लस साठवणुकीसाठी देण्यात आले. त्यानुसार या रेफ्रिजरेटरमध्ये कोविड व इतर लस साठवणूक केली जात आहे.

मात्र सर्वच रेफ्रिजरेटर नादुरुस्त असून मागील काही दिवसांत या रेफ्रिजरेटरमध्ये पाणी साचू लागले आहे. यामध्ये पाण्याचे प्रमाणही बरेच असल्यामुळे साठवणूक करण्यात आलेल्या लसीचे लेबल खराब होत आहे. याशिवाय तापमानदेखील कायम राहत नसल्याने लस खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तातडीने वरिष्ठ कार्यालयास पत्र दिले. आता वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडून काय मार्गदर्शन येणार याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. तूर्तास लसीचा साठा करावा कसा असा प्रश्न उभा राहिला आहे.

विद्युत उपकरण आहे, दुरुस्त करता येईल
केंद्र शासनाकडून किती रेफ्रिजरेटर प्राप्त झाले याची माहिती सांगणे कठीण आहे. मात्र रेफ्रिजरेटरमध्ये पाणी होत असल्याची अद्याप आरोग्य विभागाकडून माहिती मिळाली नाही. मात्र असे होत असेल तर रेफ्रिजरेटरची वॉरंटी असल्याने टोलफ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीचे अभियंते येतीलच. - डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक, आैरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...