आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार:आम्हाला सुरक्षित वाटत नाही... मुलींची व्यथा

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षातील आरशातून न्याहाळत राहतात काहीही झाले तरी मुलींवरच बंधने लादली जातात. जे करतात त्यांना शिक्षा होत नाही. त्यामुळे या गैरप्रकारांवर वचक बसत नाही. त्या मुलीने रिक्षातून उडी मारायला नको होती असे सगळे जण म्हणतात. पण कदाचित तिला त्यापेक्षा अधिक धोकादायक परिस्थितीचा अनुभव, अंदाज आला असू शकतो. रिक्षात एकटी मुलगी असली की समोरच्या आरशातून तिचे निरीक्षण सुरू होते. सरळ रस्ता सोडून आडमार्गाने रिक्षा नेली जाते. इशारे करून इतर मित्रांना बोलावतात. बाजूला बसवतात. एकट्या मुली घाबरतात. ज्या हातात बांगड्या भरतो त्याच हाताने तोंड फोडण्याचीदेखील ताकद आहे हे विसरून जातात.

आमचा पत्ता विचारतात, इन्स्टा आयडी मागतात रिक्षात बसेपर्यंत दीदी, मॅडम म्हणतात. रिक्षात मुली एकमेेकींशी, फोनवर इतरांशी काय बोलतात हे ऐकत असतात. बाकीचे लोक उतरल्यावर त्याचा धागा पकडून बोलायला लागतात. कोणत्या कॉलेजमध्ये, कुठे राहाता... वैयक्तिक माहिती विचारतात. दुर्लक्ष केले तरी असुरक्षित वाटते आणि उत्तर दिले तरी धोका वाटतो. आता तर मोबाइल नंबर द्या, इन्स्टा आयडी काय एवढे विचारण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. यामुळे एकट्या मुली घाबरून जातात.

मुलींवरची बंधनं वाढतात कोणत्याही मुलीला आपल्यासोबत अशी काही घटना व्हावी असे वाटत नाही. बऱ्याच वेळा एखाद्यासोबत काही असे घडले तरी कुणीही मदतीला समोर येत नाही. त्या विद्यार्थिनीने उडी मारली त्या वेळी एक कार थांबली, पण मदतीला त्यातून कुणी बाहेर आले नाही. घटना घडल्यावर मुलींवर बंधने येतात. अशा वेळी समाजानेदेखील या वाईट प्रवृत्तीविषयी आवाज उठवला पाहिजे. मदतीसाठी पुढे यायला हवे.

बोलण्यातून लगट करतात रिक्षात आम्ही एकट्या असलो तरी हमखास ड्रायव्हर आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना टाळले तरी विचारत राहतात. कोणत्या कॉलेजला, वडील काय करतात... सर्वच रिक्षावाले वाईट नसतात, पण असे भेटले की मुलींच्या मनात भीती बसते. घाबरून किंवा अजाणतेपणाने तिने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली की तो प्रतिसाद मानून ते अधिकच बोलायला लागतात. त्यापेक्षा आपण प्रतिसाद दिला नाही तर त्यांनाही जरब बसेल.

जबरदस्तीने बॅग उचलतात एकदा मी गावाहून आले तेव्हा भाडे वगैरे ठरवण्याआधीच रिक्षावाल्याने जबरदस्तीने माझी बॅग उचलून त्यांच्या गाडीत ठेवली. पूर्ण रस्ता प्रश्न विचारून भंडावून सोडलं. सावधगिरी बाळगून मी बाहेर रस्त्यावरच उतरून घेतलं तर आत कुठे राहता, कोणती बिल्डिंग, काय करता हे प्रश्न सुरूच ठेवले. मी जोरात सांगितले, पैसेच देणार नाही तेव्हा गप्प झाला. ही हिंमत आपल्यालाच जमवावी लागते.

माझ्या एका मैत्रिणीला वेगळ्याच वाटेला नेलं होतं शहरात असं काही झालं की मुलींची काळजी वाढते आणि पालकांची चिंताही. घरातही टेन्शन वाढते. ऑटोवाला कसा आहे हे बघून रिक्षात बसायला सांगितले जाते. पण पुढे कोण कसं वागणार हे आधी कळत नाही. सीट भरलेले असतानाही पुढे वारंवार थांबवून सीट भरत राहतात. त्यांच्या ओळखीच्या लोकांना बसवून घेतात. बऱ्याच वेळा ड्रिंकही घेतलेेले असतात. माझ्या एका मैत्रिणीला सुनसान जागी नेलं होतं. तिने घरच्यांना फोन केला, आरडाओरडा केला तेव्हा रिक्षा थांबवली.

रस्त्याने चालतानाही पाठलाग करतात एखादी मुलगी एकटी असेल तर तिच्याजवळ रिक्षा नेऊन पाठलाग करतात. कुठे सोडायचे, कुठे सोडायचे, कुठल्या कॉलेजात अशी चौकशी करत राहतात. चालवणारा रिक्षाचालक आहे, मालक आहे की त्याचा मित्र आहे काहीच कळत नाही. स्टँडवर रिक्षा उभी असते तेव्हा एक माणूस असतो, सुरू करतात तेव्हा तिसऱ्याच्याच हातात देतात. कुणाचाच युनिफॉर्म नसतो किंवा बिल्लाही. बारकोड वगैरे कधीच नसते. वाटेत मित्रांना बोलावून घेतात. सिटी बसचा काहीच उपयोग होत नाही.

िसगारेट ओढतात, कधी कधी दारूही प्यायलेले असतात रस्ते माहीत नसलेल्या मुलींना रिक्षावाले फिरवून नेतात. दुसऱ्याच मार्गाने रिक्षा काढतात. माझ्या एका मैत्रिणीला असाच अनुभव आला. शंका आल्याने तिने रिक्षा मध्येच थांबवायला सांगितली तर अधिकच्या पैशांची मागणी झाली. तिने आरडाओरडा करून लोकांना गोळा केल्यावर तिची सुटका झाली. बऱ्याच वेळा रिक्षाचालक गाडी चालवताना सिगारेट ओढतात. ते स्वत: किंवा त्यांच्या शेजारी बसलेले दारू प्यायलेले असतात. अशा वेळी मुलींसोबत जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात.

बातम्या आणखी आहेत...