आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालकमंत्र्यांनी कधी अडचणी ऐकून घेतल्या नाहीत, कधी भेटही घेतली नाही. पक्षाचे कार्यक्रम सोडा, प्रशासकीय कार्यक्रमातदेखील जिल्हाप्रमुखांची एकाधिकारशाही सुरू आहे. अशा अनेक तक्रारींचा पाढा शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वाचल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.
मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेला यश दाखवणारे शहर म्हणून औरंगाबादचे नाव घेतले जाते. तरीही जिल्ह्यातील पाच आमदार कसे काय फुटतात याचे सगळ्यांनाच आश्चर्य आहे. पक्षपातळीवरदेखील ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे. आमदारांची स्थानिक नेतृत्वावर असलेली नाराजी, त्यामुळेच शिंदे गटाकडून आलेली ऑफर जिल्ह्यातील आमदारांनी तत्काळ स्वीकारल्याची चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुखांनी कोणाचीच ताकद निर्माण होऊ दिली नाही. मनपा प्रभाग रचनेत झालेल्या उलथापालथी, पालकमंत्र्यांनी संघटनेऐवजी प्रशासकीय बाबी आणि एक-दोन लोकप्रतिनिधींपलीकडे कुणाचेही न ऐकणे, ८ जून रोजी झालेल्या सभेत संजय शिरसाट यांना भाषण न करू देणे, प्रदीप जैस्वाल यांनी प्रभाग रचनेबाबत केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल न घेणे, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण असो की मुख्यमंत्र्यांची सभा, यात स्थान न मिळणे यासारख्या अनेक कारणांची यादीच बंडखोर आमदारांनी पक्षप्रमुखांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळेच जिल्ह्यातील हा संताप शिंदेंच्या बंडखोरीच्या रूपाने बाहेर आल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी खैरे यांना आमदार रमेश बोरनारेंचा फोन आला होता. सर्वजण जिल्हाप्रमुखांच्या दादागिरीला कंटाळून जात असल्याचे सांगितले होते. पालकमंत्री सुभाष देसाई विधान परिषदेची मुदत संपताच गायब झाले. जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी केली तरी त्यांनी पुढे येऊन भूमिका मांडली नाही.
‘कोण इकडे, कोण तिकडे’ची दबक्या आवाजात चर्चा शिवसेनेतून बाहेर पडलेले मंत्री शिंदे यांनी नगरविकास खात्यातून दिलेल्या निधीतून अनेकांना कामे मिळाली. त्यात अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे कोण या गटातून त्या गटाकडे जाईल हे सांगता येणार नाही, अशी चर्चा शिवसेनेतच दबक्या आवाजात सुरू आहे. युवा सेनेतील एक गट तर आ. शिरसाटांच्या संरक्षणार्थ काम करत असल्याची चर्चा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.