आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आक्रमक:आम्ही शुद्ध पाण्यासाठी पैसे भरतो, मग मनपा विहिरीचे अशुद्ध पाणी का देतेय?

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या भागात पाण्याची पाइपलाइन नाही. त्यामुळे आम्ही पैसे भरून मनपाचे टँकर विकत घेतो. आम्ही शुद्ध पाण्यासाठी पैसे देतो तर मग आम्हाला विहिरीचे दूषित पाणी का मिळते? हे पाणी आम्हाला नकोय... असे म्हणत हनुमान टेकडी, जगदीशनगर या भागातील महिलांनी सोमवारी मनपा मुख्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत निवेदन दिले.

शहरातील पाणी बचत करण्यासाठी आतापर्यंत जलकुंभावर भरले जाणारे टँकर मनपाने अधिग्रहित विहिरीवरून भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या भागात आतापर्यंत जलकुंभावरून जे पाणी जात होते त्या ठिकाणी आता विहिरीचे पाणी जाते आहे. कोटला कॉलनी जलकुंभावरून भरले जाणारे टँकर आता मकबरा कंपाउंड येथील विहिरीतून भरले जात आहेत. हे पाणी दूषित आणि पिण्यायोग्य नाही असे या भागातील महिलांचे म्हणणे आहे.

शुद्ध पाण्यासाठी आम्ही दर महिन्याला ७३२ रुपये भरतो. वर्षाला आठ ते दहा हजार रुपये भरून आम्हाला चार दिवसांआड ४०० लिटर पाणी मिळते. असे असतानासुद्धा अशा प्रकारे विहिरीचे पाणी देणे म्हणजे आमची फसवणूक आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यावर दोन दिवसांत तुमचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी आम्रपाली सोनवणे, सविता देवकर, स्मिता पेरकर, ज्योती लाहोट, गीतांजली सोनकलगी, सुशीला बागूल, मीना किर्तक, निर्मला पवार, सुशीला पडवी, भाग्यश्री गायकवाड आदींसह जगदीशनगरमधील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. भावसिंगपुरा परिसरातील निसर्ग कॉलनी, पेठेनगर या भागातील नागरिकांनी याच विषयावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...