आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्लाय बिग कंपनीच्या विमानसेवेस १ जून रोजी औरंगाबादेतून सुरुवात झाली. हैदराबादहून २२ प्रवासी घेऊन आलेले विमान बुधवारी सकाळी ९ वाजता विमानतळावर उतरले. तेव्हा वॉटर सॅल्युट देऊन स्वागत करण्यात आले. ९.३५ वाजता ३२ प्रवाशांसह हे विमान हैदराबादकडे रवाना झाले.
कोरोनानंतर मंदावलेल्या विमानसेवेला गती देण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नुकताच चिकलठाणा विमानतळावर फ्लाय बिगच्या विमानसेवेचा शुभारंभ केला हाेता. त्यानंतर फ्लाय बिगच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हैदराबाद, मुंबई, इंदूर, पुणे, नांदेड, नवी दिल्ली, सोलापूर आदी ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी चर्चा केली. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवेचा प्रारंभ झाला.
मुंबईला औरंगाबादहून जाण्यासाठी विमान नसल्यामुळे विमानसेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. हैदराबाद उड्डाण यशस्वी झाल्यानंतर इतर पर्यायांवर विचार केला जाईल, असे फ्लाय बिगचे कॅप्टन संजय मांडविया यांनी सांगितले. दररोज सकाळी ९.०५ वाजता औरंगाबाद येथे हैदराबादहून विमान दाखल हाेईल. औरंगाबाद ते हैदराबाद प्रवास एक तास १० मिनिटांचा असून तिकीट ३१०० रुपये ते सात हजारांदरम्यान आहे.
या वेळी विमानपत्तन प्राधिकरणाचे संचालक डी. जी. साळवे, जसवंतसिंह राजपूत, फ्लाय बिगचे विश्वनाथ गोडबोले, आशुतोष बडवे, उद्योगपती सुमीत कोठरी, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट पवनकुमार आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.