आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर, मॅडम सध्या आमच्यासारख्या मुलांमध्ये गोवरची मोठ्या प्रमाणात साथ पसरत आहे. त्यामुळे आम्ही काय काळजी घ्यावी. तसेच जर तुमच्याकडे एखादा गंभीर अवस्थेत रुग्ण आला तर तुम्ही प्रथम काय करता, त्याला ऑक्सिजन केव्हा लावता, अशा एकाहून एक आरोग्यासंबंधी प्रश्नांच्या फैरी विद्यार्थ्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर केल्या. तसेच, आम्हालाही वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यामुळे आम्ही कशी तयारी करावी, याबाबतदेखील मुकुल मंदिरच्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी शहरातील सिडको परिसरातील मुकुल मंदिरच्या उच्च प्राथमिक शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एन-८ येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात शनिवारी क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. या उपक्रमात एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळणेदेखील आवश्यक आहे. त्यामुळे शाळा परिसरातील स्थळांना शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची भेट घडवून आणावी, विद्यार्थ्यांना त्याबाबतची माहिती द्यावी, असे शिक्षण विभागाने आदेशात म्हटले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुकुल मंदिरच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते.
कोरोनाकाळात तुम्हाला कधी भीती नाही वाटली का ? कोरोनाकाळात स्वत:ची काळजी घेत रुग्णांवर उपचार करताना तुम्हाला मरणाची भीती वाटली नाही का, असा प्रश्न या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर एका विद्यार्थ्याने औषधींचा वास नकोसा वाटतो. तुम्ही रोज याच वातावरणात कसे राहता? आम्हाला तर इंजेक्शनची भीती वाटते, तुम्हाला नाही का वाटत? असे एकाहून एक प्रश्न डॉ. बुशरा, डॉ. शिवाजी गाडे यांना विचारले. त्यावर डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देत सर्व शंका दूर केल्या. या वेळी ऊर्मिला जोंधळे, अनिता बोंडे, रचना वाईकर यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांत जागृती व्हावी, करिअरला दिशा मिळावी क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टींचे ज्ञान मिळते. तसेच विद्यार्थ्यांना नवीन करिअरविषयी माहिती मिळावी. हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शालेय दशेतच आरोग्याविषयी जनजागृती व्हावी हाच हेतू होता. या उपक्रमास विद्यार्थी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. -स्वाती वाहूळ, शिक्षिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.