आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना सहकारातील काय कळतं? २० वर्षांहून अधिक काळ राजकारणात असूनही त्यांनी एखादी संस्था नावारूपास का आणली नाही?’ असा सवाल करत भाजप आमदार तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खैरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांची पाटीही कोरीच आहे. त्यांची दूध सोसायटी आहे, नफ्यासाठी त्यांनी सोसायटीचे दूध जिल्हा संघाला घालण्याचे काम केले, अशी टीकाही बागडेंनी केली.
खैरेंच्या टीकेला उत्तर देताना बागडे म्हणाले, ‘सामाजिक क्षेत्रात काम करताना वय नव्हे काम पाहिले जाते. साधा कार्यकर्ता असताना मी सहकारी बँक काढली, नंतर आमदार झालो. खैरे इतकी वर्षे खासदार हाेते, त्यांनी एखादी पतसंस्था, सोसायटी, बँक का काढली नाही. जिल्हा बँकेचे पाच रुपयांचे कर्जही आपण घेतलेले नाही. माझ्या पतसंस्थेनेही कधी कर्ज घेतले नाही, असे स्पष्टीकरण देताना शिवसेनेचे दाेन मंत्री, जिल्हाप्रमुख आमच्यासाेबत असताना खैरेंना कुणी कासरा लावून ‘तिकडे’ (विराेधी पॅनलकडे) आेढले, अशी विचारणाही बागडेंनी केली.
काळेंच्या आरोपाचे खंडन करताना बागडे म्हणाले, दूध संघाचा २०११ मध्ये चेअरमन झाल्यावर सहकारच्या नियमानुसार मी या दूध संघाचे राखीव निधीचे प्रथम खाते उघडून त्यात ९० लाख जमा केले. कुठली बँक अधिक व्याज देते तेथे ठेव ठेवण्यासंबंधी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक निर्णय घेतात. जिल्हा बँकेतून ठेव काढून जनता बँकेत ठेवली असेल तर दूध संघाचा फायदाच केला. ती रक्कम आता एक कोटी १२ लाख झाली. तेव्हा आपण जिल्हा बँकेचे संचालक नव्हतो,’ असेही ते म्हणाले.
डॉ. काळे यांच्या पिसादेवीत जिल्हा बँकेची शाखा २०१४ मध्ये मंजूर झाली. मात्र जागेच्या वादामुळे अद्याप सुरू झालेली नाही. उलट माझ्या चितेगावात मी शाखा सुरू केली. डॉ. काळेंनी वडिलांची दूध सोसायटी बंद करून नवी सुरू केली. माझी ४७ वर्षांपासूनची सोसायटी अजूनही सुरू आहे. दूध संघ जे उत्पन्न घेते तेच सोसायटीने घ्यायचे नसते, परंतु काळे फायद्यासाठी काहीही करू शकतात,’ असा आरोपही बागडेंनी केला.
खैरे आमचे नेते, त्यांचा आदरच करताे : अंबादास दानवे
खैरेंनी केलेल्या टीकेबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांना विचारले असता ‘चंद्रकांत खैरे आमचे ज्येष्ठ नेते अन् मार्गदर्शक आहेत. त्यांचा मी नेहमीच आदर करताे,’ एवढेच उत्तर देऊन अधिक बाेलणे टाळले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.