आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारताच आपण सक्रिय झालात. पहिल्याच दिवशी महापालिका मुख्यालयातील सगळी दालनं पाहण्यासाठी फेरफटका मारला. तेव्हा तुम्हाला अनेक दालनं धुळीत माखलेली, अंधारात बुडालेली दिसली. या दालनांच्या भिंतींचा उडालेला रंग तुम्ही पाहिला. सुरकुत्यांप्रमाणे या भिंतींचे निघालेले पोपडे तुमच्या नजरेस पडले. पण प्रशासक महोदय ही दालनं, या भिंती आमच्यएवढ्याच जुन्या आहेत. कुणीतरी दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची वाट पाहत पाहत आम्हीही पिचून, खंगून गेलो आहोत. हे शहर प्रगत होणार, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही घरं बांधली. आपलं जीवन बदलणार, असं आम्ही मुलाबाळांना सांगत त्या चमत्कारी क्षणाकडे डोळे लावून पाहत बसलो. पाहता पाहता वर्षे उलटून गेली. दशकेही मागे पडली. आता आमची नजरच अधू होत चालली आहे. आमची घरेही पिढ्यान्पिढ्यांपासून तशाच अवस्थेत आहेत. पाया खचू लागला आहे. भिंती ढासळू लागल्या आहेत.
छतांवर उगवलेले गवत छत फोडू लागले आहे. तुम्ही आम्हाला आधार द्याल, आमचं जीवन बदलून टाकाल, आमची वसाहत समृद्ध कराल, याची आम्ही सकाळ, संध्याकाळ, रात्री उशिरापर्यंत वेड्यासारखी प्रतीक्षा करत राहतो. दिवस उगवतो आणि मावळतो. काहीच बदल होत नाहीये. गुदमरून टाकणारी धूळ सहन करत जीवघेण्या खड्ड्यांतून आम्ही चालत राहतो. हंडाभर पाण्यासाठी धावत सुटतो. दर पाच वर्षांनी होणाऱ्या घोषणांच्या वावटळीने आमचं भिरभिरं करून टाकलंय. तुम्ही प्रशासकाच्या नजरेनं दालनं पाहिली आणि त्यांचे रंग, रूप बदलून टाकण्याचे फर्मान काढले. तुमच्या फर्मानाची अंमलबजावणी होईल. दालनांना नवा रंग लागेल. कचऱ्याचे ढीग उपसून नवे दिवे लागतील. दालनांच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. पण कोणत्याही शासकासाठी जनता आनंदी राहणं, लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटणं महत्त्वाचं असतं. खरं तेच शासकाचं मुख्य ध्येय हवं. त्या ध्येयासाठी तुम्ही काही कराल का?
रोखठोक
प्रणव गोळवेलकर,
राज्य संपादक, महाराष्ट्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.