आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावळागोंधळ:कुठे संथगती, कुठे केंद्रांवर रांगा, कशी पार करणार लसीकरणाची महागंगा?

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेपासूनच्या लसीकरणावर मराठवाड्यातील सर्वसामान्यांना पडला प्रश्न

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. परंतु त्यासाठी पुरेशी लस मिळत नसल्याने अनेक ठिकाणी केंद्रे बंद करावी लागत आहेत. पुढील महिन्यात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पण मर्यादित लोकसंख्येला लस मिळत नसताना लसीकरणाची महामोहीम बारगळणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

नांदेड : मागणीच्या तुलनेत कमी लस, माेहीम संथगतीने सुरू
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी कोविशील्डच्या १२ हजार तर कोव्हॅक्सिनच्या साडेचार हजार लसी उपलब्ध झाल्या. मागणीप्रमाणे कमी पुरवठा होत असल्याने जिल्ह्यातील ४३२ पैकी काही केंद्रे बंद असल्याचे समजते. तसेच मनपाच्या वतीने शहरातील १० केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ३ उपकेंद्रे सुरू आहेत. मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने ही माेहीम संथगतीने सुरू आहे.

नियोजन करणे गरजेचे
मी एका खासगी केंद्रावर लस घेतली. त्यामुळे मला ताटकळत बसण्याची वेळ आली नाही. केंद्रावर अंतर पाळले जात नाही. लसीकरणासाठी नंबर लावल्यानंतर कोणत्या वेळेत यावे हे सांगणे अपेक्षित आहे. संगीता कुलकर्णी, शिक्षिका, नांदेड.

जालना : शहरात ५ केंद्रे बंद ठेवल्याने मनस्ताप, इतर ठिकाणी मात्र गर्दी
सोेमवारी विक्रमी १४ हजार ३०४ लाभार्थींनी रांगा लावून लस घेतली, तशाच रांगा मंगळवारीही होत्या. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे जालना शहरातील ५ केंद्रे बंद ठेवल्यामुळे आलेल्या लाभार्थींना मनस्ताप झाला. दरम्यान, गांधी चमन येथील स्त्री रुग्णालय व शकुंतलानगरातील केंद्रावर डोस आल्याचे समजताच जो-तो तिकडे धावत सुटला. मात्र, या ठिकाणी कोव्हॅक्सिनचे मोजकेच डोस होते तर लाभार्थींची संख्या अधिक होती. जिल्ह्यात ५१ केंद्रांवर मंगळवारी दिवसभरात ५०५१ लाभार्थींना डोस देण्यात आले.

परभणी : जिल्ह्यात ५५ केंद्रांवर एकूण ५८३६ नागरिकांचे लसीकरण
परभणी जिल्ह्यामध्ये ५५ केंद्रावर मंगळवारी लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून ३५१३ ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात १२३७ तर इतर केंद्रावर १०६२ लाभार्थींचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात एकूण ५८३६ लाभार्थ्यांची लसीकरण झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील लसीकरण होईल.

बीड : ११० केंद्रांवर ७६३५ नागरिकांना दिली लस
जिल्ह्यात १३४ केंद्रांपैकी ११० ठिकाणी मंगळवारी लसीकरण करण्यात आले. ७,६३५ लोकांना मंगळवारी लस देण्यात आली. खासगी ७ तर शासकीय ८ सेंटर बंद होते. केंद्रांवर होणारी गर्दी पाहता प्रत्येक केंद्रांवर फिजीकल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्क वापरा असा संदेश देण्यात आला. पण लोक गर्दी करतच होते. जिल्ह्यात ९ लाख लोकांना लस दिली जाणार आहे. त्यापैकी २ लाखांचा लसीचा टप्पा पूर्ण झाला. कोविशिल्डचे २,५२० डोस व कोव्हॅक्सिनचे २,४४० डोस शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंगोली : १८ केंद्रांवर २०२२ जणांनी घेतली लस
जिल्ह्यात ३२ पैकी १८ केंद्रांवर मंगळवारी लसीकरण करण्यात आले. या वेळी २०२२ जणांना लस देण्यात आली. यामध्ये ९७८ जणांनी पहिला तर १०४४ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. या सर्वच केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी झाली होती. हिंगोलीच्या कल्याणमंडपम येथे गर्दीला आवरताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. या एकाच केंद्रावर सुमारे ४५० जणांचे लसीकरण करण्यात आले.

आताच ही स्थिती, पुढील महिन्यात लसीकरण कसे करणार?
लस संपल्यामुळे दोन ते तीन दिवस लसीकरण बंद करावे लागत आहे. आताच ही परिस्थिती असताना पुढील महिन्यापासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस कशी मिळेल, याबाबत मनात शंका आहे. लसीकरणाचे आतापासूनच नियोजन करून जादा लसींचा पुरवठा केला पाहिजे. - अंजली गोगटे, हिंगोली.

लातूर : लस नसल्याने शहरातील लसीकरण केंद्रे २३ एप्रिलपासून बंद
लसीचा पुरवठा कमी झाल्यानंतर लातूर मनपाकडून शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे २३ एप्रिलपासून बंद आहेत. आजवर ५०,००० पेक्षा अधिक लातूरकरांना लस दिली गेली. यापूर्वी मनपाने पहिल्या टप्प्यात सरदार वल्लभभाई पटेल चौकातील मनपा रुग्णालय, गंजगोलाईजवळील साळेगल्ली येथे, पुरणमल शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत, गूळ मार्केट आदी चार केंद्रांवर लसीकरण केले. आता मात्र लातूरमधील १७ प्रभागांत प्रत्येक ठिकाणावर लसीकरणाबाबत उपाययोजना केल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...