आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांचे होणार मूल्यांकन:दहा हजार शाळांतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना 60 हजार गुरुजींचीही घेणार परीक्षा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेबाबत सतत चर्चा होते. लातूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचे मूल्यांकन ऑगस्टमध्ये केले होते. यात धक्कादायक बाबी समोर आल्या. मराठवाड्यात याच धर्तीवर आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या जवळपास दहा हजार शाळांचे मूल्यांकन प्रथम संस्था आणि शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून होणार आहे. यात शिक्षकांच्या ज्ञानाची पातळी तपासण्यासाठी मराठवाड्यातील ५५ ते ६० हजार शिक्षकांची परीक्षा घेण्यात येईल. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हतनूर येथील शाळांना भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबाबतची स्थिती कळाली. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यातील शिक्षणाबाबत माहितीदेखील मागवली. त्यानंतर बुधवारी आठही जिल्हाधिकारी आणि जि.प. सीईओंच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याचा आणि शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.

विभागीय आयुक्तांनी दिले आदेश, जानेवारीत सुरू होणार उपक्रम संरक्षणाचे धडे देणार विभागीय आयुक्तांनी लातूरचे सीईओ अभिनव गोयल यांच्यावर जबाबदारी सोपवली. गोयल म्हणाले की, मराठवाड्यात जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी तपासली जाईल. ऑगस्टमध्ये आम्ही लातूर जि.प. शाळांचा सर्व्हे केला. त्यात ४५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारदेखील येत नव्हता. आम्ही त्या विद्यार्थ्यांत सुधारणा करत आहोत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मूल्यांकनासाठी विविध अॅपदेखील तयार करण्यात येणार आहेत. आगामी काळात मुलींना कराटे शिकवून त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणार असल्याचे गाेयल यांनी सांगितले. जानेवारीत हे मूल्यांकन सुरू होणार असून एप्रिलपर्यंत ते पूर्ण होईल.

सात वर्षांनंतर ‘प्रथम’च्या माध्यमातून सर्वेक्षण प्रथम या संस्थेच्या माध्यमातून देशभरात विविध ठिकाणी शाळांतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाते. मराठवाड्यात २०१५-१६ मध्ये या संस्थेच्या माध्यमातून सर्व्हे केला होता. कोरोनाकाळात तर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झालेच नाही. त्यामुळे या मूल्यांकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्तादेखील कळण्यासाठी मदत होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांचे ‘प्रथम’द्वारे असे केले जाते सर्वेक्षण पहिलीत शिकवला जाणारा आठ ते दहा ओळींचा उतारा व एक कथा विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दिली जाते. दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये अंकसंख्या ज्ञान, वजाबाकी, तिसरीचा भागाकार अशा बेसिक गोष्टी करायला लावून विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासले जाते. तसेच मुलांना लेखन, वाचनाची व व्यावहारिक ज्ञानाबाबत माहिती विचारली जाते. त्यानंतर त्यांच्यात काय सुधारणा होणे गरजेचे आहे हे सांगितले जाते. सध्या प्रथमच्या माध्यमातून छत्तीसगडचा सर्व्हे करण्यात आला.

मूल्यशिक्षणाचे धडे द्यावेत बैठकीत केंद्रेकर म्हणाले की, मुलांना प्रार्थना झाल्यानंतर मूल्यशिक्षणाचे धडे दिले जावेत. मुलांना प्रामाणिकपणाचे महत्त्व, कठाेर परिश्रम तसेच मोठ्यांबद्दल आदर अशा गोष्टी शिकवायला हव्यात. तसेच इतर दोन कामे कमी झाली तरी चालतील, मात्र मराठवाड्यातील शाळांचा दर्जा सुधारला गेला पाहिजे याकडे गंभीरतेने पाहण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

बातम्या आणखी आहेत...