आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाविरोधातील लढाई ही महाराष्ट्रासाठी मिशन आहे. गेल्या १०० दिवसांपासून हे मिशन सुरू आहे. यात मृतांचा आकडा दिसतो, कोरोना रुग्णांचा आकडाही समोर येतो. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे किती रुग्ण बरे होऊन घरी गेले, यासाठी डॉक्टरांनी किती प्रयत्न केले हे त्यांचे योगदान समोर यायला हवे, असे मत राज्याचे आराेग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. बुधवार, १ जुलै रोजी दिव्य मराठीच्या वतीने डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये टोपे बोलत होते.
या वेळी “दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे, सीओओ निशित जैन, औरंगाबादचे युनिट हेड सुभाष बोंद्रे यांची उपस्थिती होती. टोपे म्हणाले, कोरोनाच्या लढाईत सरकारी आणि खासगी डॉक्टरांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे आहे. राज्यात जो टास्कफोर्स करण्यात आला आहे त्यात खासगी डॉक्टरांचाही समावेश आहे. डॉक्टरांच्या या योगदानामुळे कोरोना बरा होऊ शकतो, लहान मुले आणि अगदी ९९ वर्षांचे ज्येष्ठ नागरिकदेखील बरे होऊन घरी गेल्याचे उदाहरण आहे. ज्या वेळी रक्ताची नाती या परिस्थितीमुळे दूर होताना दिसतात अशा वेळी मात्र डॉक्टरांनी या रुग्णांना आपल्या नातेवाइकासारखे सांभाळले. या संपूर्ण लढाईत ५५० डॉक्टर बाधित झाले, त्यातील चार डाॅक्टरांचा मृत्यू झाला. तरीही लढाई सुरूच आहे. या लढाईत शासन आपल्या सोबत आहे. आपल्याला कुठलीही इजा म्हणजे आम्हाला इजा असल्याचेही टोपे यांनी सांगितले. डॉक्टरांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा दिल्या जातील, असा विश्वास त्यांनी दिला. या वेळी औरंगाबाद, जालना, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, जळगाव येथील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
अहंकार बाजूला ठेवा, रुग्णांवर लक्ष देऊन त्यांना बरे करणे आवश्यक
शासनाचे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. पोलिस, स्थानिक प्रशासन, त्यांची आरोग्य यंत्रणा आणि महसूल विभाग सगळ्यांची कामे विभागून देण्यात आली आहेत. त्यामुळे जबाबदारी ठरवणे सोपे जाते. या लढाईत फक्त कोरोना रुग्णांवर लक्ष देऊन ते कसे बरे होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या परिस्थितीत कोणी अधिकारी जर त्याचा इगो, अहंपणा मध्ये आणत असेल तर ते चुकीचे आहे. अशा अधिकाऱ्यांना वेळोवेळी समज दिली आहे, बाजूलाही करण्यात आले आहे, असे टोपे यांनी सांगितले.
एसएमएस पद्धतीचा अवलंब करत कोरोना सोबत जगावे लागेल
आता आपण राज्यात अनलाॅक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपली जीवन पद्धती बदलावी लागेल. एसएमएस (सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर) या गोष्टींचा वापर करून कोरोनासोबत जगावे लागले. यासाठी स्वयंशिस्त पाळावी लागणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले. पुढच्या काळात आपल्याला शाळा आणि महाविद्यालये सुुरू करायची आहेत. त्यासाठी हा मार्ग पाळावा लागणार असल्याचेही टोपे म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.