आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर का गेला नाही? ; आदित्य ठाकरे यांचा शेतकरी संवादात सवाल

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पाच मंत्री आहेत. पण एकही मंत्री अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी बांधावर का गेला नाही, असा सवाल उद्धवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. पाठीवर ४० गद्दारांचे वार घेऊन मी बळीराजाला भेटण्यासाठी फिरत असल्याचेही ते म्हणाले.

पाच बंडखोर आमदारांना आव्हान देण्यासाठी आदित्य यांच्या उपस्थितीत शिवसंवाद, शेतकरी मेळाव्याचे ७, ८ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले. सोमवारी सिल्लोड येथे मार्गदर्शन केल्यावर त्यांनी मंगळवारी बालानगर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, आमदार उदयसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती. आदित्य म्हणाले की, सध्याचे शिंदे - फडणवीस हे खोके सरकार सामान्यांचे नाही. त्यांनी शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणतीही मदत दिली नाही. ५० खोकेवाल्यांना शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला धीर देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.

मला शेतीचे काही कळत नसल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. पण मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मी कायम शेतकऱ्यांसोबतच राहणार आहे. गद्दारांमुळे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. आम्ही बिडकीनमध्ये मेडिकल डिव्हाइसचा उद्योग आणणार होतो. तो या खोके सरकारमुळे गेला, असा आरोप आदित्य यांनी केला. दावरवाडी, पाचोड, लिहाखेडी येथेही त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दावरवाडीत घोंगडे देऊन तर पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पाचोड गावात आदित्य यांचे आतषबाजीने स्वागत करण्यात आले.

सत्तारांनी काळिमा फासला
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी वक्तव्य केले. त्यासंदर्भात आदित्य म्हणाले की, सत्तारांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. यातून त्यांची नीच भावना समोर येते. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला. त्यांच्यामुळे महाराष्ट्राची लाज गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...