आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंभाजीनगर नामांतर करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. त्याचे ठरावही मंजूर झालेले आहेत. याची सुरुवात म्हणून आम्ही चिकलठाणा विमानतळाला संभाजीराजेंचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला व केंद्राकडे पाठवला. इकडे नामांतरासाठी आग्रह धरणारे विमानतळाच्या नामांतरासाठी दिल्लीत जाऊन आक्रोश का करत नाहीत, असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला. जलआक्रोश काढणारेही मागील पाच वर्षे सत्तेत होते. त्या काळात फडणवीसांनी पाणी यजनेसाठी निधी का दिला नाही, भूमिपूजन का केले नाही, असा सवाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केला. क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवला आहे. तिथे अजूनही सुशोभीकरणाची कामे होत आहेत. शहरात पर्यटकांसाठी सफारी पार्क होत आहे. मेट्रोही केली जाईल. मात्र आमची मेट्रो शहराचे विद्रूपीकरण करणारी नसेल, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. रस्ते चकाचक करणार शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. अजूनही निधी दिला जाईल. सर्वच रस्ते चकाचक केले जातील. आता जुन्या रस्त्यांचे फोटो जपून ठेवा. काही दिवसांनी तुम्हाला गुळगुळीत रस्ते दिसतील, असा आशावाद ठाकरेंनी व्यक्त केला. मराठवाड्याचा विकास समृद्धी महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल. या महामार्गाचा विस्तार जालना ते नांदेड असा करणार आहोत. १९९३ पासून मागणी असलेले परभणी आणि उस्मानाबाद येथे मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर केले. घृष्णेश्वर देवस्थानच्या सभागृहासाठी निधी दिला. जुने मंदिर, गडकिल्ले जतन करत आहोत. हे आमचे हिंदुत्व आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवणे सोपे नाही. पण जनतेच्या आशीर्वादाने आम्ही अडीच वर्षे पूर्ण केली, पुढचा कार्यकाळही पूर्ण करू. मागील २५ वर्षे ज्यांना मित्र समजले ते हाडवैरी झाले व ज्यांच्यावर वैरी समजून टीका केली ते आज सोबत आहेत, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. बाळासाहेबांनी भाजपचा महापौर केला गाेपीनाथ मुंडे यांच्या विनंतीवरून बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादेत भाजपला पहिला महापाैर केला. तेव्हा त्यांचे किती नगरसेवक आहेत हे आम्ही विचारले नाही. डॉ. भागवत कराड यांना महापौर केले. आज ते वर गेलेत. वर म्हणजे केंद्रात मंत्री झालेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले. तर केंद्राने दोन टक्के व्याजाची याेजनाच बंद केली. डाॅ. कराड यांनी आता केंद्रात आक्रोश करून ही योजना सुरू करावी. आम्ही त्यांचा सत्कार करू, असे ठाकरे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी कंपनी औरंगाबादेत आणणार : सुभाष देसाई
दावोसमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र सरकारने ८० हजार कोटींचे सामंजस्य करार केले. यातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात उद्योग उभारणार आहेत. मात्र १० हजार एकर विकसित जागा असलेल्या औरंगाबादेत यापैकी काहीच गुंतवणूक येऊ शकली नव्हती. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे पालकमंत्री असूनही औरंगाबादकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. मात्र बुधवारच्या जाहीर सभेत देसाईंनी या टीकेला चोख उत्तर दिले. औरंगाबादेत लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा मोठा उद्योग आम्ही आणणार आहोत. बजाज कंपनीने औरंगाबादेत जशी पहिल्यांदा उद्योग क्रांती केली, तशीच दुसरी क्रांती हा उद्योग करेल. मराठवाड्यात अजूनही अनेक कंपन्या आम्ही आणणार आहोत, अशी ग्वाही देसाईंनी दिली.
पाणीपुरवठा योजनेस उशीर केला तर ठेकेदाराला तुरुंगात टाकणार
औरंगाबाद शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमच्या सरकारने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र ठेकेदाराकडून संथ गतीने काम होत असल्याचे दिसते. पुढील दोन वर्षात ठेकेदाराला योजना पूर्ण करावी लागेल, अन्यथा त्याला तुरुंगात टाकू. शिवसेनेने राणेला सोडले नाही, मग हा ठेकेदार कोण, असा सवाल पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सभेत केला. देसाई म्हणाले, औरंगाबादच्या सभेची आजची गर्दी रेकॉर्ड तोडणारी आहे. नवा विक्रम या निमित्ताने झाला आहे. शहरात रस्त्याची कामे होत आहेत. जंगल सफारीची कामे सुरू झाली. घनकचऱ्याची कामे सुरू झाली आहेत. पाणीटंचाई कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दानवेंमुळे हिरवा झेंडा फडकला : खैरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खैरे व्हा बहिरे’ असा टोला लगावला होता. त्याचा समाचार घेताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘आमच्या जिल्ह्यातही एक बहिरे आहेत. केंद्राने आमच्याकडे दोन राज्यमंत्री दिलेत, मात्र त्यांना काय अधिकार आहेत? माझ्या निवडणुकीच्या वेळी रावसाहेब दानवे हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे नाटक करून बसले आणि भगवा झेंडा उतरवण्यासाठी त्यांनी ‘ट्रॅक्टर’ चालवले. त्यांच्यामुळे जिल्ह्यातून भगवा झेंडा उतरवला आणि रझाकारांचा हिरवा झेंडा चढला. उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना मी सोडणार नाही. किरीट सोमय्याचे थोबाड इथे आल्यावर लाल करू, अशा इशारा त्यांनी दिला.
दिल्लीच्या तख्ताला हादरा देणारी लाट : संजय राऊत खासदार संजय राऊत म्हणाले, “आजच्या सभेची गर्दी पाहिली तर दिल्लीच्या तख्तालाही हादरा बसेल. या जनसमुदायाचा टोला भाजपला बसला तर ते उठूही शकणार नाहीत. उद्धव ठाकरे यांची ही ताकद दिल्लीला हादरा देणारी आहे. यापुढच्या काळातही शिवसेनेचीच सत्ता कायम राहणार आहे. मराठवाड्यात खूप महिन्यांनी अशी विराट सभा होत आहे. मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी अवलाद अजून जन्माला यायची आहे हेच या गर्दीतून दिसते.’
रश्मी वहिनी हाक ऐकताच माघारी फिरल्या, आनंदाने हस्तांदोलन केले सव्वानऊ वाजता ठाकरे यांची सभा संपली. पुन्हा सुरक्षा रक्षकांनी ठाकरेंना गराडा घालून निघण्याची तयारी केली. व्यासपीठासमोरील डीमध्ये ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि धाकटा मुलगा तेजस बसलेले होते. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात तेही बाहेर पडण्यासाठी निघाले. मात्र, व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या महिलांच्या गर्दीतून ‘रश्मी वहिनी, रश्मी वहिनी’ आवाज आले. आवाज ऐकताच निघालेल्या रश्मी ठाकरे सुरक्षा रक्षकांना बाजूला करून माघारी फिरल्या व महिलांकडे गेल्या. सर्वांना हसून अभिवादन करून एक मिनिटे हस्तांदोलन करत होत्या. परत येते म्हणून मग पुढे गेल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.