आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे यांचा सवाल:ओबीसी आरक्षणप्रश्नी 15 महिन्यांत मागासवर्ग आयोग का नेमला नाही?; सत्ताधारी ओबीसी नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: नामदेव खेडकर
  • कॉपी लिंक
  • केंद्राकडे इंपेरिकल डाटा नाहीच

केंद्र सरकारकडील जनगणनेच्या ‘डाटा’ला इंपेरिकल ‘डाटा’ म्हणणे चुकीचे आहे. पंधरा महिन्यांपूर्वीच न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की, स्वतंत्र मागासवर्ग आयोग स्थापन करा व ओबीसींची आकडेवारी, राजकीय प्रतिनिधित्व किती आहे हे आयोगामार्फत सादर करा. असे असतानाही पंधरा महिन्यांत राज्य सरकारने मागासवर्ग आयोग का स्थापन केला नाही, असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला. महाराष्ट्रातील सत्ताधारी ओबीसी नेते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.'

ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रश्नावर मुंडे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने संवाद साधला तेव्हा त्या म्हणाल्या, ओबीसींचे राजकीय आरक्षण सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे गेले. न्यायालयाने राजकीय आरक्षण घटनाबाह्य ठरवलेले नाही. केवळ ५० टक्क्यांपेक्षा अधिक सामाजिक आरक्षण होऊ नये यासाठी ओबीसींची स्वतंत्र आकडेवारी, ओबीसींचे मागासलेपण व ओबीसींचे राजकारणातील प्रतिनिधित्व किती आहे याच्या आधारे आरक्षणाची मर्यादा ठरवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या बाबींचा अधिकृत ‘डाटा’ तयार करण्यासाठी स्वतंत्र मागासवर्ग आयोग स्थापन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. असे असतानाही राज्य सरकारने मागील पंधरा महिन्यांत मागासवर्ग आयोग स्थापन केला नाही.

केंद्राकडे इंपेरिकल डाटा नाहीच
मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडे इंपेरिकल डाटा असल्याचा उल्लेख करून केंद्र सरकार हा डाटा दाबून ठेवत असल्याचा आरोप केला आहे याकडे लक्ष वेधले असता मुंडे म्हणाल्या, केंद्राकडे जनगणनेचा डाटा आहे. त्याला इंपेरिकल डाटा म्हणता येणार नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडे तो मागण्यापेक्षा राज्यात स्वतंत्र मागासवर्ग आयोग स्थापन करून ओबीसींची आकडेवारी जाहीर करावी. न्यायालयासमोर मांडावी.

सत्तेतील ओबीसी नेत्यांचे शहाणपण चालेना
ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्यानंतर सत्ताधारी ओबीसी नेत्यांनीच आंदोलन, मोर्चा काढण्याची भाषा केली आहे. हे आरक्षण पूर्णपणे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले याची जाणीव असतानाही ते असे करतात. सत्तेपुढे त्यांचे शहाणपण चालत नाही हेच यातून दिसते, अशी टीकाही मुंडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...