आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तरप्रदेशातील हाथरस मध्ये झालेल्या घटनेवरून राजकारण सुरु आहे. मात्र या सारखी प्रकरणे महाराष्ट्रातही झाली तेव्हा खासदार संजय राऊत यांनी तोंड का उघडले नाही असा सवाल करीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शनिवारी (ता. ३) हिंगोली जिल्हा दौऱ्यात खासदार राऊत व सरकारवर सडकून टिका केली.
हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या नट, नटी, कंगणा, सुशातसिंह या पेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे त्यावर बोलले पाहिजे. कुठल्याही विषयावर राजकारण केले जात असलल्याचा आरोप त्यांनी केला. उत्तरप्रदेशातील हाथरस येथील प्रकरणात राजकारण केले जात असून अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रातही घडल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात घडलेल्या घटनांवर खासदार संजय राऊतांनी तोंड उघडले नाही असा सवाल त्यांनी केला.
राज्यात पिकांचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. राज्य सरकार विमा कंपन्यांसाठी आहे का असा सवाल त्यांनी केला. कृषी व महसुल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरण्या ऐवजी विमा कंपन्यांचे पंचनामे विमा देण्यासाठी गृहीत धरले जात आहेत. एकदा यंत्रणेने पंचनामे केल्यानंतर पुन्हा पंचनामा करायची गरज काय असा सवाल करीत यंत्रणेने केलेले पंचनामे पिकविमा देण्यासाठी गृहीत धरले जावे अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी पंन्नास हजार देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर ते विसरले. कोवीडच्या परिस्थितीत टोलमाफी करण्याचे सोडून टोल वाढवून ठेवला. कोवीडमुळे कंत्राटदारांचे नुकसान झाल्याने टोलवाढविल्याचे सरकार सांगत आहे. मात्र सरकार सर्व समान्यांचे आहे का कंत्राटदारांचे असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकार संवेदनाहिन असून दिलेल्या कुठल्याही शब्दाला जागत नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
साहेब, पाच एकर शेतातून १० क्विंटल सोयाबीन निघाल्यावर जगायचं कसं, येहळेगावच्या गोकर्णाबाई सोळंके यांनी मांडली प्रविण दरेंकरांकडे कैफीयत
साहेब, येहळेगाव सोळंके परिसरात तीन वेेळा ढगफुटी झाली, शेतात आता पिका ऐवजी तणकट जास्त आहे. पाच एकर शेतातून १०क्विंटल सोयाबीन निघाल्यावर जगायचं कसं अशी कैफीयत महिला शेतकरी गोकर्णाबाई सोळंके यांनी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याकडे शनिवारी ता. ३ मांडली. शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून द्या अशी विनंतीही त्यांनी केली.
औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके शिवारात दरेकर यांनी भेट देऊन पिक नुकसानीची पाहणी केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, नारायण सोळंके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी दरेकर यांनी शेतकरी राजेश सोळंके, गोकर्णाबाई सोळंके यांच्या शेतात भेट देऊन पाहणी केली अन त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी गोकर्णाबाई यांनी कैफीयत मांडली. पाच एकर शेतात सोयाबीन पेरणीसाठी चाळीस हजार रुपयांचा खर्च लागला आहे. हंगामात पाऊस सुरु झाल्यानंतर पिक चांगले येईल असे वाटले होत. मात्र तीन वेळा ढगफुटी झाली अन हाती आलेली पिके डोळ्या देखील वाहून जाऊ लागली. दिवसरात्र शेतात काबडकष्ट केल्यानंतर पावसामुळे संपूर्ण मेहनत वाया गेली. शेतात आता पिका ऐवजी तणकटच जास्त आहे. पाच एकरातून १० क्विंटलच सोयाबीन हाती येईल पण रब्बीच्या पेरणीसाठी शेती दुरुस्तीचा खर्चच त्यापेक्षा अधिक होणार आहे. या परिस्थितीत खायचे काय अन जगायचं कसं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पिकविमा भरला पण अद्याप कोणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणी आले नाही, त्यामुळे विमा मिळण्याचीही शाश्वती नाही. त्यामुळे आता तुम्हीच शासन दरबारी आमचे म्हणणे मांडून आम्हाला मदत मिळवून द्यावी अशी कैफीयत त्यांनी मांडली.
यावेळी दरेकर यांनी या भागातील नुकसानीची सविस्तर माहिती शासनाकडे दिली जाणार असून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.