आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरतरुण प्रेमात हिंसक का होतात?:आजच्या तरुणाईचे प्रेम नेमके चुकते कुठे? जाणून घ्या मानसोपचार तज्ज्ञांकडून

अनिल जमधडे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

4, 5 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर आफताबने श्रद्धाचा खून करून तिच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे केले. तर, माझ्याशी लग्न करत नाही म्हणून औरंगाबादेत एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेत मैत्रिणीलाही पेटवले. अनेक प्रेमप्रकरणांचा शेवट अशा क्रूर पद्धतीने सध्या होताना दिसत आहे. यामागे नेमकी कारण काय? आजच्या तरुणाईचे प्रेम नेमके कुठे चुकत आहे? नाते असे टोकाला जावू नये, यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी, याबद्दल जाणून घेऊया मानसोपचार तज्ज्ञांकडून...

अचानक नियंत्रण सुटते आणि...

मानसोपचारतज्ज्ञ संदिप शिसोदे यांनी सांगितले की, काही काळ प्रेमात राहिल्यानंतर नाते असे टोकाला जाण्याची अनेक कारणे आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या नोकरी, शिक्षण, वेतन यावरून तरुणांमध्ये वाढलेला तणाव. या तणावाला कसे सामोरे जावे, हे तरुणांना समजेनासे झाले आहे. त्यामानाने आपला प्रियकर, प्रेयसी किंवा मित्र, मैत्रिणी यांच्यावर नियंत्रण ठेवणे, यांना हाताळणे त्यांना सोपे वाटते. मात्र, यात थोडेसेही वितूष्ट निर्माण झाले तर कालपर्यंत जे आपल्या नियंत्रणात होते, ते आता आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहूण तरुण हिंसक होतात. त्यातून हत्या करण्यापर्यंत मजल जाते.

आपण ज्याच्या प्रेमात असतो त्या व्यक्तिला अतिमहत्त्व दिले जात आहे. त्यात समोरील व्यक्तीला तिची स्पेसही दिली जात नाही. ती व्यक्ती माझ्यापासून दूर जाऊच नये, माझी नाही तर कोणाचीच नाही, एवढ्या टोकापर्यंत ही भावना जात आहे. आणि पुढे कधी संबंधित व्यक्ती वेगळी झालीच तर ती गोष्ट पचवणे तरुणांना अवघड जाते.

प्रेम तपासून पाहा

मानसोपचारतज्त्र डॉ. निशिगंधा व्यवहारे यांनी सांगितले की, आजच्या तरूणाईने आपली प्रेमाची व्याख्या एकदा नीट पडताळून पहायला हवी. प्रेम आणि आकर्षणातला फरक लक्षात घ्यायला हवा. 'तू मेरी नही हुई तो किसी और की नही हो सकती' हा विचार म्हणजे प्रेम असत नाही तर हा संकुचित आणि कोत्या मनाचा विचार आहे.

सोशल मीडियामुळे फॉल्स रिडिंग

मानसोपचारतज्ज्ञ संदिप शिसोदे यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आता वास्तविक आयुष्य आणि आभासी आयुष्यातील रेषा धुसर होत आहे. सोशल मीडियावर आपल्याला लवकरात लवकर प्रतिसाद मिळावा, अशी आशा असते. तोच प्रकार आता वास्तविक नात्यातही घडू लागला आहे. सोशल मीडियाप्रमाणेच वास्तविक नात्यातही आपल्याला झटपट लाईक्स, प्रतिसाद हवे असतात. याला फॉल्स रिडिंग करणे म्हणतात. हे प्रमाण आता वाढत आहे. आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही की तणाव निर्माण होत आहे. नात्यांमध्ये वाट पाहावी लागते, हे तरुणांनी समजून घ्यायला हवे.

मला डिच केले

अनेकदा आपल्याला समोरील व्यक्तीने नाकारले, ही भावना पचवणेही अनेकांना फार कठीण जाते. अहंकार दुखावला जातो. इतर गोष्टींना किंवा इतर बाबींमधील अपयशाला तरुणाई ज्या सहजतेने घेते, त्याच सहजतेने प्रेम प्रकरणांमध्ये नकाराला तरुणाई घेत नाही. समोरच्याची इच्छा नसली तरी ती गोष्ट मला मिळावीच, हा अट्टहासच मुळात चुकीचा आहे, हेच तरुणांना समजत नाही. त्यात अहंकारामुळे हत्येसारख्या घटना घडतात.

प्रेम समजतोय ते नेमक काय?

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निशिगंधा व्यवहारे यांनी सांगितले की, प्रेमात स्वातंत्र्य, एकमेकांच्या भावनांचा आदर, विश्वास जबाबदारीचे भान असते. त्याही पलीकडे समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आनंद असतो जबरदस्ती नाही. आकर्षणात मात्र सगळं वरवर असतं. हो ला हो करणं. तिसऱ्या व्यक्तीशी बोललेलं चालत नाही, अविश्वास, इनसिक्युअर वाटत राहतं. प्रेमाच्या नावाखाली अनेक गोष्टींचे अट्टाहास असतात. त्यामुळे ज्याला आपण प्रेम समजतोय ते नेमकं काय आहे ते आधी समजून घ्यायला हवं.

कुटुंब हे एक भक्कम सपोर्ट सिस्टीम

मानसोपचारतज्ज्ञ विक्रांत पाटणकर यांनी सांगितले की, सध्या अनेक जण लिव्ह ईनमध्ये राहणे पसंत करत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंब म्हणून जी काही सपोर्ट सिस्टीम असते, ती लिव्ह ईनमध्ये नसते. त्यामुळे तणाव दूर करणारे, आपल्या सांभाळून घेणारे इतर मार्ग खुंटतात. त्यात पार्टनरसोबत अ‌ॅडजस्ट करण्यापेक्षा अपेक्षाच अधिक ठेवल्या जातात. त्या पूर्ण झाल्या नाही की, दारू, सिगरेट अशा गोष्टी वाढतात. मुलींमध्येही हे प्रमाण आता वाढले आहे.

त्यामुळे काहीही झालं तरी कुटुंबाला विश्वासात घेणे, त्यांच्याशी अशा गोष्टींवर बोलणे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे तरुणांनी विसरू नये. कारण प्रेमात, लिव्ह ईनमध्ये तुमचे काहीही झाले तरी कुटुंब तुमचे वाईट व्हावे, अशी इच्छा कधीच करणार नाही. त्यामुळे काही वाद किंवा टोकाच्या भूमिकेपर्यंतजाण्याआधी कुटुंबाशी बोलण्याचा, त्यांच्याशी संवाद ठेवण्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...