आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ वर्धापन दिन:दोन कौशल्य विकास केंद्रे उभारणार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र सुरू करू : कुलगुरू

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई येथे सरकारने विद्यापीठाला २५ एकर जमीन दिली आहे. तर जालना येथे १० एकर जमीन मिळाली आहे. या दोन्ही ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करू. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भव्य इमारतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र सुरू करू, अशी घोषणा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी बुधवारी केली. विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्याचा अध्यक्षीय समारोपात ते बाेलत हाेते.

प्रारंभी ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना ‘जीवन साधना’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. विलास खंदारे, साकेत प्रकाशनचे बाबा भांड, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संजय सांभाळकर आदींची मंचावर उपस्थिती होती.

डाॅ. येवले म्हणाले, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिप्लोमा इन व्हायरोलॉजी आदी कोर्स सुरू केले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अश्वमेध क्रीडा महोत्सव, अखेरच्या आठवड्यात राष्ट्रीय स्तरावरील कॉमर्स कॉन्फरन्स होईल. जानेवारीत पश्चिम विभागीय कुलगुरू परिषद विद्यापीठात होणार आहे.’ डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आभार मानले.

दहा कर्मचाऱ्यांचाही गौरव
पीएचडी मिळवणारे वरिष्ठ सहायक अमोल घुकसे, संजना शिंगाडे, ग्रंथालय सहायक एम. एम. फरताडे, एल. बी. कामडी, कनिष्ठ सहायक व्ही. बी. सूर्यवंशी, योग शिक्षकाची पदविकाप्राप्त कविता तुपे, एम.लिब पदवी प्राप्त एस. एम. सूर्यवंशी, रवींद्र पारधी, भगवान फड (एलएलबी), लक्ष्मीछाया जहागीरदार (एलएलएम) या कर्मचाऱ्यांचा कुलगुरू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज वक्तृत्व स्पर्धेतील विजेते प्रथम शेख यास्मीन, द्वितीय वैष्णवी अंभोरे, तृतीय स्नेहल अकोलकर या विद्यार्थ्यांनाही बक्षिसे देण्यात आली.

नोकरशहाराज नको : डाॅ. सुधीर रसाळ
डॉ.सुधीर रसाळ म्हणाले, विद्यपीठात प्राध्यापक सर्वोच्च स्थानी असले पाहिजे. पाश्चात्त्य देशांमध्ये प्राध्यापकांना महत्त्व असते. पण भारतातील विद्यापीठात नोकरशहांचे वर्चस्व असते. मी ३५ वर्षे येथे अध्यापनाचे काम केले आहे, त्याची दखल घेतली गेली. याचा मला आनंद आहे. ‘भांड यांनी भाषण केले. ज्येष्ठ कवी प्रा. दासू वैद्य यांनी मानपत्राचे वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...