आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचा जनतेला संदेश:महाराष्ट्रातील संतांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन वाटचाल करणार, भारत जोडो यात्रा आज मध्य प्रदेशात

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जामोदगुजरातच्या दौऱ्यानंतर खा. राहुल गांधी आज भारत जोडो यात्रेच्या निमखेडी येथील तंबूत परतले. त्यामुळे दोन दिवसांपासून मुक्कामी असलेली भारत जोडो यात्रा आता बुधवारी सकाळी ६ वाजता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशतील बऱ्हाणपूरकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सोडण्यापूर्वी राहुल गांधी यांनी जळगाव जामोद येथून जनतेला एक संदेश दिला आहे.

महाराष्ट्रातील संतांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करत असल्याचे त्यांनी संदेशात म्हटले आहे.या संदेशात गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरू झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ असलेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातून ही पदयात्रा आता मध्य प्रदेशात जात आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि संत गजानन महाराज तसेच महाराष्ट्रातील सर्व संतांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत. या संतांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा, तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत.संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही अशा लोकांचे ऐकले जे कठोर परिश्रम करतात, परंतु त्यांच्या तपस्यांचे फळ त्यांना मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न, त्याची कारणमिमांसा करता असे लक्षात आले की, कृषी साहित्याच्या किंमतीत झालेली प्रचंड भाववाढ, शेतमालाच्या भावात असलेली अनियमितता आणि फसलेली पीकविमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलले आहे, हे पाहून मन व्यथित झाले. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हताश झालेले, आपल्या स्वप्नाचा चुराडा झालेले पाहिले. आदिवासी समुदाय हा या देशाचा मूलनिवासी आहे आणि त्याच्या अधिकारावर गदा आलेली आहे. वन हक्क जमीन २००६ चा कायदा कशा पद्धतीने पायदळी तुटवला जात आहे हे सुद्धा लक्षात आले.भाजपाचे काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती सिमित ठेवण्याचे धोरण याला कारणीभूत आहे. एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात संस्कृती, धर्म, जात आणि भाषा याचा वापर करून उभे करून संघर्ष उभा करण्याच्या भाजपच्या नितीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी शाहू, फुले, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हा राहिलेला आहे आणि हा जाज्वल्य विचार देशाला नेहमी दिशा देत राहिला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला दिला. तसेच एक नवीन ऊर्जा दिली, असे राहुल गांधी यांनी संदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...