आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेचा कारभार स्वीकारल्यानंतर नव्या मनपा आयुक्तांचे पहिलेच स्टेटमेंट समोर आले आहे. शहरातील बेसिक प्रश्न काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी 2 दिवस शहरात फिरणार आहे. त्यानंतर ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिपणे काम करेल. तसेच सगळ्यात मोठ्या पाणी प्रश्नावर देखील त्यांनी यावेळी काम करणार असल्याचा पुनरुच्चार केला.
अशी ग्वाही नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
डॉ. चौधरी सोमवारी मनपात येऊन कारभार हाती घेणार होते. मात्र, त्यांना कोल्हापुरवरून यायला उशिर झाला. त्यामुळे रात्री उशिरा आस्तिककुमार पांडेय यांच्याकडून त्यांनी मनपाचा चार्ज घेतला. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांचे मनपात आगमन झाले. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारले. रात्रीच पदभार घेतल्याचे स्पष्ट करत त्यांनी औपचारिकता पूर्ण केली. तसेच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेला विभाग, नाव सांगून स्वत:चा परिचय करून दिला.
विभागवार पाहणी
मनपाचा कारभार स्वीकारल्या नंतर पांडेय व चौधरींनी सर्व विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील अधिकारी व कर्मचारी कसे काम करतात, त्यांची बसण्याची जागा आदींवर त्यांनी सुक्ष्म निरीक्षण देखील केले. पदाधिकाऱ्यांची दालने, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचे सभागृह देखील पाहिले.
किती कामे केलीत?
अधिकाऱ्यांची तोंड ओळख व विभागाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर डॉ. चौधरींनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामे करून घ्यायची असल्याचे सांगत, त्यांच्या विभागातील मनुष्यबळ, किती कामे पूर्ण, किती अपूर्ण आदी विषयीची माहिती तयार ठेवण्याचे निर्देश दिले. दोन दिवसांत त्याचे तुम्हाला प्रस्तुतीकरण करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.
विनाविलंब नागरी सेवा
डॉ. चौधरी म्हणाले की, 2015-16 मध्ये जिल्हा परिषद सीईओ म्हणून मी येथे काम केलेले आहे. त्यावेळी शहरातील समस्यांबाबत ऐकले आहे. त्याला आता सहा वर्षे झाली आहेत. त्यापैकी अनेक समस्या सुटल्याही असतील. आता मनपा आयुक्त म्हणून मला नागरी समस्या प्रत्यक्ष सोडवायच्या आहेत. यासाठी पहिले दोन दिवस मी शहरात फिरणार आहे. बेसिक प्रश्न जाणून घेतल्यानंतर नागरिकांना विनाविलंब दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रधानक्रम देईल.
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विशेष भर
आरोग्य सेवासुविधा, नवीन मनपा आरोग्य केंद्र गरज असल्यास सुरु केले जातील. औषध उपचार प्रभावीपणे मिळायलाच हवेत. यासाठी जातीने लक्ष दिले जाईल. मनपा शाळेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जावे, यावर विशेष भर असेल. यासाठी काही बदल करणे आवश्यक असल्यास ते तातडीने केले जातील. 2 हजार कोटींची पिण्याच्या पाण्याची योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्ण केले जातील. स्वच्छतेला प्रथम प्राधान्य राहील. पिण्याचे पाणी वेळेत नागरिकांना मिळेल. अशी ग्वाही दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.