आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ७१ सदस्यीय अधिसभेतून ८ व्यवस्थापन परिषद सदस्य निवडून जातील. त्यासाठी भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ‘उत्कर्ष’चे नेते आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणुकीला ३ दिवस बाकी असताना विधान परिषदेतून एका सदस्याला अधिसभेत आणले आहे, तर ‘मंच’नेही तीन आठवड्यापूर्वी दोन कर्मचाऱ्यांना कुलगुरूंचे नामनिर्देशित सदस्य म्हणून अधिसभेत आणले आहे.
अधिसभेच्या निवडणुका निर्विघ्नपणे झाल्यानंतर आता व्यवस्थापन परिषदेच्या १० सदस्यांची निवडणूक होणे बाकी आहे. या निर्वाचित १० पैकी ८ सदस्य अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेतून जातात. विद्या परिषदेतून २ सदस्यांची निवड केली जाते. सध्या अधिसभेतून ८ सदस्य निवडून जाण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. १३ मार्चला होणाऱ्या अधिसभेची बैठक आमदारांना मतदान करता यावे म्हणून रविवारी (१२ मार्च) केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे विधानसभेतून नामनिर्देशित झाले आहेत. विधान परिषदेतून एक सदस्य अधिसभेत येतात.
या जागेवरही काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. ‘उत्कर्ष’चे नेते सतीश चव्हाण यांच्या शिफारशीवरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ९ मार्च रोजी ही नियुक्ती केली आहे. उत्कर्ष आणि मंचमध्ये किती काट्याची टक्कर आहे याची प्रचिती राजेश राठोड यांच्या नामनिर्देशनावरून येऊ शकते. उत्कर्षने आमदारांच्या एकूण ३ पैकी २ मते खिशात घातलीत. चौगुलेंनी मत दिले तर त्यांचे मत ‘मंच’ला मिळू शकेल, तर दुसरीकडे ‘मंच’चे सचिव डॉ. गजानन सानप यांनी कुलगुरूंच्या ४ नामनिर्देशित सदस्यांपैकी ३ आपल्या बाजूने करून घेतले आहेत. त्यापैकी १ नगर परिषद सदस्य आहे. महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय कर्मचाऱ्यांमधून प्रत्येकी १ सदस्यही नामनिर्देशित केले आहे. विद्यापीठातील सुधाकर चव्हाण आणि नाईक कॉलेजचे आनंद वाघ यांची नियुक्ती (१९ फेब्रुवारी) केली असून हे ३ सदस्य ‘मंच’च्या बाजूने मतदान करतील अशी चिन्हे आहेत.
विषयपत्रिकेतील १३ पैकी १ विषय अर्थसंकल्पाचा अधिसभा सुरू झाल्यावर मागील बैठकीतील ‘इतिवृत्त’ व कृती अहवाल अंतिम होईल. त्यानंतर निवडणूक होईल. सर्वप्रथम उत्कर्षच्या ८ पैकी ४ सदस्यांना बिनविरोध विजयी घोषित करून त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. नितीन जाधव (संस्थाचालक), दत्तात्रय भांगे (पदवीधर), डॉ. गौतम पाटील (प्राचार्य) अाणि डॉ. रविकिरण सावंत (प्राध्यापक) यांचा त्यात समावेश असेल. उर्वरित ४ सदस्यांसाठी निवडणूक होईल. तक्रार निवारण समिती, विद्या परिषद व स्थायी समितीत ५ सदस्यांचे नामनिर्देशन केले जाईल. प्रश्नोत्तराचा तास, अर्थसंकल्प, ऑडिट रिपोर्ट, वार्षिक लेखे आदींसह १३ विषयांवर कामकाज केले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.