आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर मात:प्रबळ इच्छाशक्ती अन् सकारात्मकतेतून या ज्येष्ठांनी केली कोरोनावर मात

औरंगाबाद/ नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या कोरोना संसर्गामुळे धास्तावलेल्यांना धीर देणाऱ्या चांगल्या बातम्याही कमी नाहीत. यात संबंधित व्यक्तीचे वय किती, त्याला कोणता रोग आहे, इतर कोणते आजार आहेत यापेक्षा त्या व्यक्तीची सकारात्मकता आणि इच्छाशक्ती कशी आहे यावरही रुग्ण बरा होणे बहुतांश वेळा अवलंबून असते. अशी वयाची ८० पार केलेली, काहींनी शंभरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

हृदयविकाराचे चार झटके येऊनही मनमाडच्या ९२ वर्षीय रेल्वे पेन्शनरची कोरोनावर मात
मनमाड | रेल्वेतील ९२ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव किसन शिंदे यांनी २६ दिवसांची यशस्वी झुंज देत अखेर कोरोनावर मात केली. शिंदे यांना ४ वेळा हृदयविकाराचे झटके येऊन गेले आहेत. अँजिओप्लास्टी झाली आहे. अनेक वर्षांपासून मधुमेह व उच्च रक्तदाबही आहे. ते म्हणतात, घाबरून न जाता सकारात्मक विचार ठेवले. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य वेळी औषधे व स्वच्छतेसह सर्व काळजी घेतली तर नक्की बरे होतो.

केज तालुक्यातील ९० वर्षीय पहिलवानाने केले कोरोनाला दोन वेळा ‘चितपट’
केज | आडस (ता.केज, जि.बीड) येथील जुन्या पिढीतील पहिलवान ९० वर्षीय पांडुरंग आत्माराम आगलावे यांनी एकदा नव्हे, तर दोन वेळा कोरोनाला चितपट केले. दुसऱ्या वेळी त्यांचा एचआरसिटी स्कोअर १८ होता हे विशेष. कोरोनाला न घाबरता सामोरे जावे. याहीपेक्षा कोरोना होऊ नये म्हणून मास्क लावणे व कोविड सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन आगलावे यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील १०५ वर्षीय आजोबा अन् ९५ वर्षांच्या आजीनेही जिंकली कोरोना लढाई
लातूर | काटगाव तांडा येथील १०५ वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण व ९५ वर्षीय त्यांची पत्नी मोताबाई यांनी अवघ्या सात दिवसांतच कोरोनाला हरवले. कोरोना झाल्यानंतर धैर्याने त्याला तोंड दिले तर काही होऊ शकत नाही, असे सांगून सरकारी डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच पुनर्जन्म मिळाला, अशा शब्दांत त्यांनी ऋण व्यक्त केले.

एचआरसीटी स्काेअर २५; मधुमेह, वय ८८ वर्षे तरी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवले
लासलगाव | एचआरसीटी स्कोअर २५, हृदयविकार व मधुमेहाने ग्रस्त, वय ८८ वर्षे मात्र जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी कोरोनाला हरवले. त्यांचा एचआरसीटी स्कोअर २५ होता. मात्र, घरी जाण्याचा अट्टहास केल्याने रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली. सध्या लासलगाव येथील निवासस्थानाबाहेर ते निसर्गाच्या सान्निध्यात ऑक्सिजन मशीनचा अल्प वापर करत असूनही त्यांची प्रकृती सुधारत आहे.

संकलन : नीलेश देसाई, संतोष गालफडे, पंकज जैस्वाल

बातम्या आणखी आहेत...