आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील वाहतूक कोंडी सोडवणार, मनपा प्रशासकांची माहिती:पोलिसांच्या मदतीने प्रमुख रस्ते, चौकातील पार्किंग स्पॉट ठरवणार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने पार्किंग पॉलिसी निश्‍चित केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जागाच ठरलेल्या नाहीत. प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर सात ठिकाणी पेड पार्किंग सुरू केली होती. पण यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने शहरातील प्रमुख रस्ते, चौकातील पार्किंग स्पॉट निश्चित करून त्यावर पट्टे मारण्याचे ठरवले आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

पालिकेने कॅनॉट प्लेससह इतर ठिकाणी महिनाभर पेड पार्किंग सुरू केली हाेती. मात्र, यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द केला. मनपाने शहराची पार्किंग समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र पार्किंग पॉलिसी तयार केली आहे. त्यानुसार त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी अद्याप जागा निश्चित केल्या नाहीत. आता मनपा व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांचे एक संयुक्त पथक शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करून पार्किंग स्पॉट निश्चित करणार आहे.

मुख्य चौकांभोवती नो पार्किंग झोन : शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या मुख्य चौकांभोवती नो पार्किंग झोन घोषित करण्यासाठी त्याची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. तसेच पार्किंगसाठी मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागा ठरवून तेथे पट्टे मारून पार्किंगची शिस्त नागरिकांना लावण्यात येईल.

पंधरा दिवसांत सीपींसोबत बैठक वाहनांची बेशिस्त पार्किंग रोखण्यासाठी जागोजागी पट्टे मारणे, मुख्य चौकांजवळील कोंडी सोडवण्यासाठी नियोजन व खुल्या जागांवर पेड पार्किंगसाठी वाहनतळ उभारणे असा त्रिसूत्री कार्यक्रम ठरवला आहे. पंधरा दिवसांत पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्याची अंमलबजावणी होईल.