आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळीच्या सुट्या, शाळा-महाविद्यालये बंद असल्याने मागील २० दिवसांत रक्तदान शिबिरांचे आयोजन होऊ शकले नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे. दोन हजार रक्तपिशव्या साठवणुकीची क्षमता असलेल्या घाटीच्या विभागीय रक्तपेढीत ४५० पिशव्या आहेत. जेव्हा की दररोज एक हजार जणांना रक्ताची आवश्यकता असते.
दिवाळी संपताच आता शिबिरांना सुरुवात होते आहे, असे रक्तपेढीचे समाजसेवा प्रतिनिधी हनुमान रुळे यांनी सांगितले. मात्र, शिबिरांचा वेग वाढला पाहिजे. दिवाळीतील दिवसांचा अंदाज असल्याने दिवाळीपूर्वीच नियोजन करून दीड हजार रक्तपिशव्यांचा साठा केला होता. आता तो संपत आला आहे. रक्तापेक्षाही प्रामुख्याने प्लेटलेट्सचा तुटवडा आहे.
शहरात शासकीय रक्तपेढी धरून १२ प्रमुख रक्तपेढ्या आहेत. मात्र, सर्वत्र शिबिर बंद असल्याने रक्तसाठ्याची पातळी कमाल मर्यादेच्या खाली आली आहे. महाविद्यालयातील तरुण रक्तपेढ्यांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात. याशिवाय वाढदिवस, उत्सवांमध्येही शिबिरांतून रक्तसंकलन होते. दिवाळीत रक्तदान शिबिरांचे आयोजन नगण्य असते. दुसरीकडे लोक सर्वत्र फिरत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढलेले असते. त्यामुळे अधिक रक्ताची आवश्यकता असते.
घाटी रुग्णालयात ११ जिल्ह्यांतून रुग्ण उपचारांसाठी येतात. याखेरीज अपघातातील जखमींनाही सर्वात आधी घाटीत आणले जाते. अशा वेळी रक्ताची नितांत आवश्यकता असते. रक्तपेढीत सद्य:स्थितीत ४५० रक्तपिशव्या आहेत. मात्र, प्लेटलेट्सची संख्या शून्यावर आली आहे.
रक्तदानासाठी पुढे यावे
रक्तदान शिबिरे होत नसल्याने प्लेटलेट्सचा साठा संपला आहे. रक्तसाठाही संपण्याच्या दिशेने चालला आहे. आता नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
डॉ. प्रगती फुलगीरकर, घाटी रक्तपेढी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.