आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला, तेव्हापासून आपल्या देशाच्या लष्कराची कामगिरी कायमच गौरवशाली राहिलीय. लष्कराच्या याच अभिमानास्पद कामगिरीचे प्रतीक म्हणजे अहमदनगर येथील रणगाडा संग्रहालय.
आ ज मी आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे, जिथे मी अगदी नुकताच जाऊन आलो. ते संस्मरणीय स्थळ म्हणजे अहमदनगरचे रणगाडे संग्रहालय. भारतीय युद्ध इतिहासात रणगाड्यांनी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली. जगातील व भारतातील रणगाड्यांचा ज्वलंत इतिहास या संग्रहालयातून आपल्यासमोर येतो. प्रत्येक भारतीय नागरिकाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही जागा आहे.
भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. तेव्हापासून आपल्या देशाच्या लष्कराची कामगिरी कायमच गौरवशाली राहिलीय. लष्कराच्या याच अभिमानास्पद कामगिरीचे प्रतीक म्हणजे अहमदनगर येथील रणगाडा संग्रहालय.
अहमदनगरजवळ सोलापूर रस्त्यावर इंडियन आर्म्ड कोअर सेंटरचे मुख्यालय आहे. त्यामुळे इथे लष्कराशी निगडित असणाऱ्या रणगाडे, तोफगोळ्यांचे तसेच लष्करातील अनेक दुर्मिळ वस्तूंचे संग्रहालय आहे. १९९४ ला या संग्रहालयाचे उद्घाटन लष्कराचे तत्कालीन जनरल बी.सी. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि आशियातील एकमेव असे हे संग्रहालय आहे. वेगवेगळ्या काळात वापरण्यात आलेले दारूगोळे आणि रणगाडे या ठिकाणी आहेत. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील अनेक रणगाडे येथे बघायला मिळतात. त्याची सविस्तर माहितीही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. इथे ठेवण्यात आलेल्या प्रत्येक रणगाड्याचे वैशिष्ट्य आहे. त्याची माहिती घेताना आपल्याला आपल्या सैन्याच्या पराक्रमाची कल्पना येते. याच ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाशी निगडित आठवणींचे वेगळे दालन दोन विभागात साकारण्यात आले आहे. ब्रिटिश व्हॅलेंटाइन २, चर्चिल एमके ७, जपानी पद्धतीचे काही रणगाडे तसेच भारतीय बनावटीचे विजयंता टँक असे काही परदेशी, तर काही भारतीय बनावटीचे रणगाडे पाहायला मिळतात. पहिल्या रणगाड्यापासून आजच्या अद्ययावत रणगाड्यापर्यंत सर्व इतिहास आपल्यासमोर उलगडतो. सेंच्युरियन टर्ट (जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून आकाशात अचूक मारा करणारा), topas amfibious ( पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी चालणारा) अशा रणगाड्यांवर नजर खिळून राहते. तीन मोठ्या हॉल्समध्ये वेगवेगळ्या रेजिमेंट्सनी मिळवलेले विजय सचित्र स्वरूपात प्रदर्शित केले आहेत. लष्कराची शिस्त, त्याग, शौर्य समजून घेण्यासाठी आणि हा अनुभव साठवून ठेवण्यासाठी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यायला हवी. अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर फरह बक्ष महालाजवळ असलेले आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूलने १९९४ मध्ये उभारलेले हे संग्रहालय म्हणजे अहमदनगर शहराचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेच भूषण आहे. आशिया खंडातील या एकमेव संग्रहालयात इंग्लंड,अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, फ्रान्स आदी देशांचे ४० पेक्षा जास्त विविध रणगाडे ठेवण्यात आले आहेत. जमिनीत पुरलेले सुरुंग नष्ट करणारे, रस्त्यातले अडथळे दूर करून सैन्याचा मार्ग मोकळा करणारे, पाण्यात तरंगणारे, असे विविध प्रकारचे रणगाडे येथे आहेत.
आपला लष्कराचा गौरवशाली इतिहास, अभिमानास्पद वर्तमान व उज्ज्वल भविष्यकाळ बघायचा असेल तर हे संग्रहालय नक्की पाहा. लष्कराची शिस्त, त्याग, शौर्य समजून घेण्यासाठी आणि हा अनुभव साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक देशप्रेमी भारतीयाने या संग्रहालयाला एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी.
उमेश पटवर्धन -संपर्क : 7066956334
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.