आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाचा दुसरा दिवस:मजुराने पोलिस ठाण्यात 12 वाजता दिली माहिती, पंच न आल्याने 4.30 वाजेपर्यंत पडून होता महिलेचा मृतदेह

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौधरीनगर परिसरात आढळला महिलेचा मृतदेह; तोंडावर आणि डोक्यावर वार करून खून

काम करण्यासाठी जात असलेल्या एका मजुरास महिलेचा पडलेला निर्वस्त्र मृतदेह मंठा रोडवरील चौधरी नगरच्या मागे दिसून आल्याने सकाळी १२ वाजता त्या मजुराने या बाबत तालुका पोलिसांना माहिती दिली. यानंतर दुपारी १ वाजता पोलिस फिंगर प्रिंट तज्ञ, श्वान पथकासह घटनास्थळी आले. परंतु, ४ वाजूनही शासकीय विभागाचा पंच न आल्यामुळे या महिलेचा मृतदेह ४.३० वाजेपर्यंत तब्बल साडेचार तास पडून होता. घटनास्थळी असलेल्या तालुका जालना पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह झाकून ठेवला होता. दुपारच्या २ वाजेच्या जेवणाच्या सुटीमुळे पंचाला उशीर झाला. परंतु, पोलिसांना अशा घटनांमध्ये नेहमीच पंचाची वाट पाहावी लागते.

शासन परिपत्रकानुसार खुनाच्या गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी पंच म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना घेतले जाते. गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच न्यायालयात सुनावणीच्या वेळी फितूर होतात. त्यामुळे गृहविभागाने पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा आदेश गृहविभागाने काढलेला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या यादीसह संबंधित पोलिस ठाण्यांना आदेश येऊन धडकले आहेत. या आदेशामुळे पोलिसांच्या पंचनाम्याचे ओझे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्याही पाठीवर आले आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपासी अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्यावेळी उपस्थितीत असलेल्या पंचाचे बयाण कालावधी उलटून गेलेला असतो. तपासिक अधिकाऱ्यांनी तत्कालीन परिस्थितीत उपस्थितीत केलेले पंच सुनावणीदरम्यान, प्रामाणिक राहतील, याची खात्री नसते. यामुळे ऐनवेळी पंच फितूर होत असल्यामुळे बऱ्याचशा गुन्ह्यांत आरोपी निर्दोष सुटतात. यामुळे दोषारोपसिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना पंच करून फितूर होणार नाही, याची शाश्वती गृहविभागाकडून जारी केलेली आहे. परंतु, जालना पोलिसांना अनेकदा अशा खुनाच्या घटनांमध्ये पंच मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते. जालना शहरापासून जवळच असलेल्या चौधरी नगरच्या पाठीमागे असलेल्या ओसाड भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने त्या महिलेच्या पंचनाम्यासाठीही जालना तालुका पोलिसांना चांगल्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच डीवायएसपी सुधीर खिरडकर, तालुका जालन्याचे पोलिस निरीक्षक यशवंत बागुल, मुळक यांच्यासह फिंगर प्रिंट तज्ञ, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणी त्या महिलेचे काही ओळखीचे पुरावे मिळतात का, याची तपासणी केली. परंतु, काही आढळून आले नसून, त्या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पीआय बागुल यांनी दिली. दरम्यान, सोमवारीच पाहेगाव-सेवली रोडवर जळालेला मृतदेह आढळला होता. मंगळवारी पुन्हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तपास सुरू आहे

मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळाहून काही पुरावेही गोळा केले आहेत. या पुराव्यानुसार तपास सुरू आहे. सुधीर खिरडकर, डीवायएसपी, जालना.

घटनास्थळावर आढळला दारूच्या बाटल्यांचा खच

निर्वस्त्र अवस्थेत सापडलेल्या महिलेवर अत्याचार झाल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, घटनास्थळाच्या परिसरात दारूच्या बॉटल, चकण्याचे पाकीट, मद्य प्राशन करण्यासाठी असलेले ग्लास, दारूच्या फुटलेल्या बाटल्या या परिसरात पडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासाला ‘क्लू’ मिळू लागला आहे.

मृतदेह पाठवला जिल्हा रुग्णालयात : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी व नंतर कधी मृतदेहाचा सांगाडा लागला तर तो मृतदेह जाळण्याएवेजी दफन केल्या जातो.

महिला पोलिसांनी मृतदेह झाकला साडीने, अत्याचाराचा संशय

तिकिटांनी तपासाला येणार वेग : सदरील महिलेच्या मृतदेहाजवळ ओळख पटण्यासाठी काही कागदपत्रे नाहीत. परंतु, त्या महिलेच्या जवळ काही तिकिटे पडलेली होती. तपासाच्या अनुषंगाने ती तिकीट रेल्वे की बसची होती, याबाबत माहिती उघड करणे टाळले. परंतु, या तिकिटामुळे पोलिसांच्या तपासाला वेग येणार आहे.

महिलेच्या डोक्यावर, तोंडावर, अंगावर वार

मृत महिलेच्या चेहरा, डोक्यासह इतर ठिकाणी वार आहेत. या दृष्टीने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. त्या महिलेचा गळा आवळण्याचाही प्रयत्न झाल्याचे घटनास्थळाहून मिळालेल्या काही पुराव्यावरून निष्पन्न होत आहे. दरम्यान, घटनास्थळाहून त्या महिलेचे पडलेले दागिने, गळा आवळण्याचा रुमाल आदी साहित्य जप्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...