आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वसमतच्या महिला रुग्णालयात सीझेरीयन झाल्यानंतर काही वेळातच महिलेचा मृत्यू, वैद्यकिय पथकाच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी

हिंगोली9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शासकिय रुग्णालयाचे अधिकारी आऊट ऑफ रेंज

वसमत येथील महिला रुग्णालयात सीझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या सहा तासातच महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ९) अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तर वसमत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय पथकाच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. माता मृत्यूच्या घटनेनंतरही शासकिय रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी आऊट आफ रेंज होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील गंगासागर दुर्गादास कांबळे (२२) या महिलास प्रसुतीकळा येत असल्याने त्यांना प्रसुतीसाठी सोमवारी ता. ८ वसमत येथील महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकिय अदिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांच्यावर सिझेरीयन शस्त्रक्रिया केली होती. यामध्ये त्यांना मुलगाही झाला. मात्र शस्त्रक्रिये नंतर काही वेळातच कांबळे यांना अस्वस्थ वाटू लागले त्यांच्या पोटात त्रास होऊ लागला. सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियांनी तेथे कर्तव्यावर असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनाही सांगितले. मात्र शस्त्रक्रियेनंतर अवघ्या सहा तासातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरानंतर आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली.

या प्रकरणी त्यांचे वडिल सुगंधचंद पुरभाजी गायकवाड (रा. सोमवारपेठ वसमत) यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आज दुपारी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस निरक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, जमादार शेख पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सदर मृतदेहावर वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली जात आहे. त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी, भुलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ व अन्य एका वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पथकाच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी केली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले. त्यांच्या अहवालानंतरच गंगासागर कांबळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर नवजात बालकाची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.

शासकिय रुग्णालयाचे अधिकारी आऊट ऑफ रेंज

शासकिय रुग्णालयाच्या आखत्यारीत येणाऱ्या वसमतच्या महिला रुग्णालयात माता मृत्यूची घटना घडल्यानंतरही रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी आऊटऑफ रेंज होते. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, महिला रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेश चव्हाण यांचे भ्रमणध्वनी आऊट आफ रेंज असल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...