आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतीसोबत मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिला डॉक्टरला भरधाव वाहनाने धडक दिली. यात डॉ. लीला नामदेव भुजबळ (४६) यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सात वाजता गांधेली गावाजवळ ही दुर्घटना घडली. डॉ. लीला या गेली २० वर्षे धूत रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. मात्र गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेताना याच रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी कळताच त्यांच्या सहकारी डॉक्टर व परिचारिकांना अश्रू अनावर झाले होते.
गेल्या महिनाभरापासून डॉ. लीला यांनी पतीसोबत मॉर्निंग वॉक करणे सुरू केले होते. गांधेली परिसरात त्या राहतात. त्यामुळे घराजवळ नव्याने झालेल्या धुळे- सोलापूर महामार्गावर भुजबळ दांपत्य रोज फिरायला जात होते. बुधवारी सकाळी सहाला ते घराबाहेर पडले. एका बाजूने त्यांचे पती पुढे, तर लीला पाठीमागे चालत होत्या. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या वाहनाने लीला यांना धडक दिली. डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या व पतीच्या अंगावर पडल्या. त्याच वाहनाची नामदेव यांना धडक बसली. दोघेही कोसळले. स्थानिकांनी तातडीने वाहनातून या दोघांना धूत रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहनचालक पळून गेला. डॉ. लीला धूत रुग्णालयात २० वर्षांपासून आरएमओ म्हणून नोकरीस होत्या. रोज सकाळी नऊ वाजता त्या ड्यूटीवर यायच्या. भीती वाटत असल्याने त्यांनी कधीच दुचाकी चालवली नाही. पती त्यांना सोडण्यास-नेण्यास येत असत. बुधवारी मात्र सकाळी नऊ वाजता ड्यूटीवर येण्याऐवजी डॉ. लीला जखमी अवस्थेत धूत रुग्णालयात दाखल झाल्या. हे कळताच सहकारी डॉक्टर, नर्स धावतआल्या. वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी दोन तास शर्थीचे प्रयत्न केले. दोन पिशव्या रक्त दिले. मात्र, साडेनऊ वाजता लीला यांची प्राणज्योत मालवली.
कोरोनाकाळात गावातील बाधितांची केली मनोभावे शुश्रूषा
डॉ. लीला यांचे कुटुंब मूळ गांधेलीचे. त्यांच्या पतीचे वर्कशॉप असून मोठी मुलगी कॉमर्सचे शिक्षण घेते. त्यांना आठ वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगाही आहे. कोरोनाच्या काळात डॉ. लीला यांनी गावातील प्रत्येक कोरोना रुग्णाला मदत केली. त्यांच्यामुळे एकाही रुग्णाला उपचारासाठी बाहेर जायची गरज पडली नाही, असे सांगताना ग्रामस्थांचा कंठ दाटून आला. सायंकाळी पाच वाजता गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.