आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:किरकोळ वादातून दिराने केला वहिनीचा खून, डोक्यात केले कुऱ्हाडीचे वार

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथे शेतामध्ये भोजनासाठी बोलणाऱ्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून दिराने खून केल्याची घटना बुधवारी (ता. २२) दुपारी दोन वाजता घडली आहे याप्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील सविता संजय जाधव ( ३०) यांच्यासोबत त्यांचा दीर रामेश्वर ऊर्फ माधव समाधान जाधव याचे दोन-तीन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. मात्र किरकोळ स्वरूपाचे भांडण असल्यामुळे हा वाद तेथेच मिटला.

दरम्यान, आज सविता जाधव ह्या गावातील इतर महिलांसोबत जोडतळा शिवारातील एका शेतात निंदण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सर्व महिला शेतात झाडाखाली बसून जेवण करीत होत्या. यावेळी त्या ठिकाणी रामेश्वर ऊर्फ माधव जाधव हा देखील आला. त्याला पाहताच सविता जाधव यांनी जेवण्यासाठी बोलावले. मात्र त्याने सविता जाधव यांच्या जवळ येऊन मागचा-पुढचा विचार न करता त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथे उपस्थित असलेल्या इतर महिलाही घाबरून ओरडू लागल्या. यावेळी रामेश्वर ऊर्फ माधव जाधव यांने महिलांनाही धमकी दिली अन घटनास्थळावरून पळ काढला. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक रामेश्वर वैजने, बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मनपिल्लू, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, धाबे, गोरले, महिला पोलीस कर्मचारी सारिका राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.