आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भुमरे साहेब आता मंत्रिमंडळात, 300 रुपये तरी द्या':मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल, पैसे देऊन गर्दी जमवण्याचा आरोप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये आज दुपारी जाहीर सभा होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये दोन कार्यकर्तांचा संवाद असून सभेला गर्दी जमवण्यासाठी महिलांना पैसे वाटप करण्याबाबत ते बोलत आहेत. दरम्यान, ही क्लिप नेमकी कुणाची आहे? हे अद्याप समजू शकले नाही. तसेच, दिव्य मराठीही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

काय संवाद आहे क्लिपमध्ये

व्हायरल क्लिपमध्ये एक कार्यकर्ता अडीचशे रुपयांत सभेला येण्यास महिला नकार देत असल्याचे सांगत आहे. सभेला येण्यासाठी किमान 300 रुपये देण्याची मागणी महिलांनी केल्याचे हा कार्यकर्ता सांगत आहे.

पाहूयात व्हायरल संवाद...

पहिला कार्यकर्ता : हॅलो, त्या महिलांच काय करायचं? पाठवायच की नाही पाठवायच?
दुसरा कार्यकर्ता : पाठवायचय ना. त्या महिलांना अडीचशे रुपये घेऊन ठेवलेत. नही आले तर अवघड विषय होतो.
पहिला कार्यकर्ता : किती जणींना पाठवायच?
दुसरा कार्यकर्ता : किती येतील? जेवढी येतील तेवढे येतील.
पहिला कार्यकर्ता : पण, त्या महिला 250 रुपयांत ऐकेनात. किमान 300 रुपये तरी द्या म्हणताय
दुसरा कार्यकर्ता : आता काय खिशातून भरायचे का?
पहिला कार्यकर्ता : भाऊ, किमान 300 रुपये तरी द्या म्हणताय महिला. सभेसाठी पूर्ण दिवस जातो ना. औरंगाबादहून पैठणला घेऊन जायचे म्हणजे 300 रुपये जाताच ना. तसंच आता भुमरे साहेब मंत्रिमंडळात आहेत. 300 रुपये द्यायला पाहिजे, असं महिलांच म्हण्णं आहे.
पहिला कार्यकर्ता : काय करायच मग? की उद्या सकाळी फोन लावू
दुसरा कार्यकर्ता : 250 रुपयेच सांग

अंबड, घनसावंगीतही पैसे वाटले - खैरे

समाजमाध्यमांवर ही क्लिप व्हायरल होताच उद्धव ठाकरे गटाने रोहियो मंत्री संदिपान भुमरेंवर टीकेची झोड उठवली आहे. औरंगाबादचे माजी मुख्यमंत्री चंद्राकांत खैरे यांनी म्हटले आहे की, टेम्पररी मुख्यमंत्री आज पैठणला येत आहेत. बंडखोर आमदार आणि आता मंत्री असलेल्या भुमरेंनी त्यांची जाहीर सभा ठेवली आहे. यापूर्वी भुमरेंची पैठणला सभा झाली. त्यात खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच त्यांना फटकारलय. पहिले बदनामी झाली असल्यामुळे ते आता पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. मला याबाबत अंबड, घनसावंगी, पाथर्डीहूनदेखील फोन आला आहे. त्यात सभेसाठी पैसे वाटत असल्याच म्हटले आहे.

प्रत्येकाला दीड हजार - दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील सभेसाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे. दानवे म्हणाले, अंगणवाडी सेविकांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना अद्याप मदत दिली नाही. इगतपुरी येथे आदिवासींची मुलांची वेठबिगारीसाठी विक्री झाली. सरकारने याची साधी दखलही घेतली नाही. हे सरकार असंवेदनशील आहे.

पैसे देण्याची गरज नाही - भुमरे

आ. संदिपान भुमरे यांनी सभेसाठी पैसे वाटल्याचा आरोप फेटाळला आहे. भुमरे म्हणाले, पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा हाेणार हे ऐकूनच काहींच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे ते नको ती बडबड करत आहेत. सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. आमच्यावर पैठणच्या लोकांचे प्रेम असल्याने रेकॉर्डब्रेक गर्दी होईल. मी तीस वर्षांपासून लोकांमधून निवडून येताेय. दानवेंनी आधी लोकांमधून निवडून येऊन दाखवावे.

बातम्या आणखी आहेत...