आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये गरिबांचे हाल:तीन लेकरांसह पोलिसांकडे जाऊन ती म्हणाली, ‘घरात अन्नाचा कणही नाही’

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून 45 किलो किराणा सामान घेऊन दिले

रोजच्याप्रमाणे आंबेडकर चौकात सिडको पोलिस ठाण्याचे कर्मचारी बुधवारी नाकेबंदीवर भर उन्हात उभे होते. तेव्हा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतील एक महिला तीन लेकरांसोबत त्यांच्याकडे आली. माझी लेकरं उपाशी आहेत, मला मदत नको. पण हाताला काहीतरी काम द्या, अशी विनंती तिने केली. डोळ्यातून अश्रूूच्या धारा निघत असलेली महिला लेकरांसाठी मदत मागत असल्याचे पाहून पोलिसही हळहळले. त्यांनी तत्काळ पैशांची जमवाजमव केली आणि तिला पंचेचाळीस किलो किराणा सामान घेऊन दिले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी तिला काम मिळवून देण्याचा विश्वासही दिला. रिक्षा करून तिला घरी पोहोचवले.

पोलिस नाईक प्रकाश भालेराव यांच्याकडे ती आली होती. त्यांनी काही विचारण्याआधीच तिने रडत रडत कृपा करून मदत करा, मी हात जोडते, अशी विनंती केली. भालेराव यांनी तिला न घाबरता बोल, असे म्हणत विश्वास दिला. तेव्हा तिने तिची कर्मकहाणी सांगितले. पाच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. मात्र, कोरोनामुळे घरकाम बंद झाले. नंतर मिळेल ते काम करून तिने कसाबसा उदरनिर्वाह चालवला. मात्र, मागील काही दिवसांपासून किराणा सामानासाठीही तिच्याकडे पैसे उरले नाही.

यावेळी बंदोबस्तावर उपनिरीक्षक अवचार, सहायक फौजदार हिवराळे, सुरेश भिसे व इतर नऊ कर्मचारी होते. भालेरावांनी तत्काळ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना कल्पना दिली. त्यांनी तिला सर्वतोपरी मदत करा, असे सांगत नाकेबंदीतून काही जणांना सूट दिली. मग भालेराव आणि इतरांनी वर्गणी करत पंचेचाळीस किलो किराणा सामान घेऊन तिला दिले. गिरी यांच्या सूचनेवरून तिला रिक्षातून हिनानगरातील घरीही नेऊन सोडले.

बातम्या आणखी आहेत...