आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गर्भपात झाल्याचे पती व कुटुंबीयांपासून लपवत चार महिन्यांच्या चिमुकलीला घरातून पळवून नेणाऱ्या अंबाजोगाई येथील राणी शिवाजी यादव (२८, रा. कुत्तर विहीर) या महिलेला पोलिसांनी अंबाजोगाईतून अटक केली. १७ फेब्रुवारी रोजी चाकण येथून राणीने चिमुकलीला पळवले.
या प्रकरणात राजेंद्र प्रभाकर नागपुरे (५३, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली. ती चिमुकली आपली मुलगी असल्याचे ते सांगत असले तरी पोलिस तपासात मात्र तिचा जन्म पुण्यात शिक्षण घेत असलेल्या जोडप्याच्या प्रेमसंबंधातून झाल्याचे समोर आले. या सर्व घटनांमध्ये मात्र चिमुकलीची अाबाळ झाली.
सध्या आरोपी राणीच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली. धनश्री राजेंद्र नागपुरे (४ महिने) असे चिमुकलीचे नाव आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागपुरे राहत असलेल्या ठिकाणी आरोपी महिला १७ फेब्रुवारी रोजी काम मिळवण्याच्या बहाण्याने आली. त्यानंतर नागपुरे यांची मुलगी धनश्री हिला घरातून घेऊन निघून गेली. याबाबत गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. बाळाचे अपहरण करणारी महिला बालाजीनगर, मेदनकरवाडी येथे गुन्हा घडण्यापूर्वी काही दिवस राहण्यास होती. मात्र, गुन्हा घडल्यानंतर ती बेपत्ता आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. संशय बळावल्याने आरोपी महिलेचे रेखाचित्र तयार करून तिचा पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी महिलेला पोलिसांनी अंबाजोगाई येथून चार महिन्यांच्या बाळासह ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने बाळाचे अपहरण केल्याचे सांगितले. राणीला पकडण्यासाठी चाकण पोलिसांनी खूप बारीक तपास केला. आरोपी महिलेचे रेखाचित्रही तयार करण्यात आले होते.
चाकण रुग्णालयात जन्म, नंतर राजेंद्र यांना दिले बाळ
फिर्यादी राजेंद्र नागपुरे व त्यांची पत्नी हे दांपत्य अपहृत बाळाचे जन्मदाते नाही, ही बाब तपासात समोर आली. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका जोडप्याला प्रेमसंबंधातून हे बाळ झाले होते. त्या जोडप्याने नागपुरे दांपत्याच्या नावाचा वापर करून चाकण येथील एका दवाखान्यात बाळाला जन्म दिला. त्यानंतर नागपुरे यांना ते बाळ देऊन टाकले. बाळाचा सांभाळ करत असले तरी नागपुरे हे त्याचे जन्मदाते नसून अन्य जोडपे असल्याचे समोर आले. फिर्याद देताना मात्र राजेंद्र यांनी ही बाब लपवल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
चिमुकलीला केला सांभाळण्याचा बहाणा
नागपुरे हे बाळाचा सांभाळ करण्यासाठी एका महिलेच्या शोधात होते. याबाबत आरोपी राणीला माहिती मिळाली. बाळाला सांभाळण्याच्या बहाण्याने नागपुरे यांच्याकडे आल्यानंतर चिमुकलीला घेऊन ती पळून गेली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.