आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगण्याने छळले होते:20 वर्षांत 1500 हून अधिक पोस्टमॉर्टम; कुजलेल्या, फुगलेल्या मृतदेहांत काम, पण पगार फक्त 1500!

छत्रपती संभाजीनगर। प्राची पाटील13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

50 हजार लोकसंख्येचे लासूर स्टेशन आणि आजूबाजूच्या 30 ते 40 खेड्यांमध्ये होणारे मृत्यू, या सर्वांसाठी एकमेव ठिकाण म्हणजे लासूरचा पोस्टमार्टम विभाग. आणि या विभागाला डॉक्टरांच्या बरोबरीने सांभाळणाऱ्या 35 वर्षीय मायाताई साळवे. यासोबतच रात्री 8 ते सकाळी 8 डिलिव्हरी वॉर्डमध्ये रात्रपाळी करणाऱ्या आणि रात्रभर काम केल्यानंतरही सकाळी हॉस्पिटलचे आवार आणि सर्वसाफसफाई करूनच घरी जाणाऱ्या कमलाबाई त्रिभुवन. या दोन महिलांची भेट घेण्यासाठी मी थेट पोहोचले लासूरला.

आणि यावेळी अतिशय धक्कादायक माहिती माझ्यासमोर आली. आज 2023 मध्ये जिथे शहरात मुलांना दिला जाणारा पॉकेटमनी हा देखील 2 ते 3 हजाराच्या घरात असताना या दोघीजणी महिना दीड हजारावर ही मेहनतीची कामे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून करत आहेत.

लासुरचे पोस्टमार्टम विभाग.
लासुरचे पोस्टमार्टम विभाग.

औरंगाबाद पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले लासूर स्टेशन गाव. 50 हजार लोकसंख्येच्या गावात एक प्राथमिक केंद्र. गावाच्या वेशीवरच छोट्याशा जागेत हे प्राथमिक केंद्र. तसे पाहायला गेले, तर अतिशय स्वच्छ व नीटनेटका आवार. एका कोपऱ्यात झाडू मारताना 50-55 वयाच्या आसपास असलेल्या कमलाबाई दिसल्या. वयाच्या मानाने अजूनही काटक असलेले शरीर. मात्र, चेहऱ्यावर चिंतेच्या जाळ्यामुळे पडलेल्या आठ्या दुरूनही दिसल्या. जवळ गेल्यावर नमस्कार म्हणून बोलायला सुरुवात केली खरी, मात्र फारस काही बोलायला सुरुवातीला त्या इच्छुक नव्हत्याच.

आत्तापर्यंत अनेक जण येऊन गेले मोठमोठी आश्वासन देऊन गेले. मात्र त्यातील कोणतेही आश्वासन अजून पूर्ण झालेले नाही. असे कमलाबाईंचे म्हणणे. त्या म्हणाल्या तीन-चार महिन्यांपूर्वी ते मंत्री सत्तार का कोण येऊन गेले, कमी पगार असणाऱ्या आम्हाला कायमस्वरूपी करू असे ते म्हणाले, पण त्या एक महिन्याचे आज चार महिने उलटून गेले. सत्तार ही तिकडेच गेले आणि त्यांचे आश्वासनही.

कमलाबाई पुढे म्हणाल्या 2002 मध्ये माझी आई अंजनाबाई राबडे वारल्या आणि त्यानंतर 2007 पासून ते आज 2023 पर्यंत मी या ठिकाणी साफसफाईचे काम करत आहे. 2007 मध्ये महिना दीड हजार एवढे वेतन मला मिळायचे आणि आज 2023 मध्येही तेवढीच वेतन मिळते.

कमलाबाईंच्या चेहऱ्यावरील विषण्णता मलाही हताश करून गेली. 2007 मध्ये असलेली महागाई आज अस्मानाला भिडली आहे. गॅसच्या किमती तर नुकत्याच वाढल्या आणि अशा परिस्थितीत संसाराचा गाडा त्या कशा ओढत असतील हा प्रश्न मला पडल्यावाचून राहिला नाही. हाच प्रश्न पुढे मी त्यांना विचारला तेव्हा त्या म्हणाल्या, गॅसच्या किमती कितीही वाढू द्या, मी अजूनही चुलीवरच जेवण बनवते. चुलीवर जेवण बनवताना निघालेल्या धुरामुळे कमलाबाईंच्या डोळ्यांवरही परिणाम झालाय. मात्र, गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने चूल हा एकमेव पर्याय पोटाची खाचखळगी भरण्यासाठी आपल्याकडे असल्याचे त्या म्हणतात.

कमलाबाई या रात्रपाळीत प्रसूतीच्या कामात मदत देखील करतात. प्रसूतीच्या आधी आणि नंतर येणारी सर्व कामे त्या एकहाती सांभाळतात. मग त्यात सर्व घाण साफ करणे असो किंवा वेदनांनी ओरडणाऱ्या एखाद्या महिलेला धीर देणे असो, तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणे असो. कमलाबाई तत्परतेने सर्व कामे करतात. कामात समाधान आणि आनंद शोधणाऱ्या कमलाबाई प्रेरणा देतात. मात्र, दुसऱ्यांना वेदनांमधून मुक्त करणाऱ्या कमलाबाईंच्या वैयक्तिक आयुष्यात अंधार आहे.

महिना दीड हजारावर घर भागत नाही. त्यांच्या मुलांना देखील कायमस्वरुपी नोकरी नाहीच. अशावेळी ओढाताण होते. पोट भरणे देखील अवघड होऊन बसते. कमलाबाई म्हणतात, शासनाला एकच विनंती आहे, आमचे थोडे तरी वेतन वाढवावे, म्हणजे चुलीला तरी सुट्टी मिळेल. आताशा डोळे फारशी साथ देत नाहीत. शेवटी मॅडम, खरच काही होईल का आमचं? हे विचारताना कमलाबाई भावुक झाल्या. मळालेल्या फाटक्या पदराने डोळे पुसत त्यांनी हातात झाडू घेतला. आणि उरलेली साफसफाई करण्यासाठी निघून गेल्या.

कमलाबाईंशी बोलत असतानाच मायाताई साळवे घरून आल्या होत्या. 15 दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन झाल्याने त्या घरीच होत्या. वडील जाण्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मात्र त्यांच्या कामाचा आणि मिळणाऱ्या वेतनाचा प्रश्न विचारताच त्यांच्या चेहऱ्यावरच्या दुःखाच्या छटा आणखी गडद झाल्या. मायाताई म्हणाल्या, याआधी 2-3 जण येऊन गेले. आमच्या बातम्या करून गेले, पण काही झाले नाही. आता तर सरकारने आम्हाला काढून टाकण्यात यावे, असे आदेश काढलेत. जे काम आम्ही करतो. तेच काम कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांकडून करुन घेण्यात यावे, असे म्हटले आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने आम्हाला काढलेले नाही. पण आजही दीड हजार वेतनात एक रुपयाही वाढलेला नाही.

गेल्या 15 वर्षांपासून मी याठिकाणी पोस्टमार्टमचे काम करते. कधी कोणाच्या मृतदेहाला अळ्या लागलेल्या असतात, मृतदेह सडलेले असतात. कधी आत्महत्या, खून, अपघात यांसारख्या प्रकरणांमध्ये मृतदेहाची वाईट अवस्था असते. अशावेळी रक्ताचे नातेवाइकही जवळ यायला तयार होत नाहीत. मात्र, मी कुठलीही किळस न करता आम्ही सर्व काम पूर्ण करतो. विहिरीत उडी मारुन आत्महत्या केलेल्या प्रकरणात तर मृतदेह हा फुगून वरती येतो अशावेळी तो वास कोणताही सामान्य माणूस सहन करु शकत नाही. मात्र आम्ही त्या मृतदेहाला हात लावतो.

लासूर जवळच समृद्धी महामार्ग, सोलापूर महामार्ग गेल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. अनेकदा अपघातात काहीजण दगावतात. अशावेळी त्यांना लासूरलाच पोस्टमार्टमसाठी आणले जाते. कधीकधी रात्री-अपरात्री पोस्टमार्टमसाठी मायाताई यांना उठावे लागते. मायाताईंनी काही दिवसांपूर्वीचा प्रसंग सांगितला. जवळच्याच टेकडीवर पोलिसांना एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. यावेळी डॉक्टर, पोलिस आणि मायाताईंना त्या टेकडीवर जावे लागले. उंच अशी टेकडी चढून कुजलेल्या मृतदेहाच्या हाडांचे सांगाडे त्यांनी वेचले. हाड गोळा करून पिशवीत भरले. आणि पुन्हा टेकडी उतरुन खाली आले. अशाप्रकारचे काम सुद्धा करावे लागत असल्याचे मायाताई सांगतात.

पुढे मायाताई म्हणाल्या, कधीकधी पोस्टमार्टमसाठी मृतदेहाला घेऊन आलेल्या नातेवाईकांना आमचे काम पाहून रडू येते. ज्या कामासाठी सहजासहजी कोणी पुढे येत नाही ते काम तुम्ही कसे करतात. हा प्रश्न ते विचारतात. तुम्हाला किळस येत नाही का? असा प्रश्नही अनेकदा विचारला जातो. मात्र, खरे सांगायचे तर आजपर्यंत मी 1500 हून अधिक पोस्टमार्टम मी केलेले आहेत. त्यामुळे आता किळस, घाण वगैरे असे काही होत नाही. शेवटी मजबुरी सुद्धा आहेच. नातेवाईक आम्हाला बळजबरीच चहापाण्याला 50 रुपये देतात.

माया साळवे.
माया साळवे.

तुमच्या घरची परिस्थीती कशी आहे, यावर मायाताई म्हणतात, माझे पती मजुरीचे काम करतात. 3 मुले आहेत. तिन्ही मुले गावातल्या शाळेत जातात. पण कधी सुट्टी असेल किंवा घरात गरज असेल तेव्हा माझी मुले सुद्धा काम करण्यासाठी वडिलांबरोबर जातात. आमच्यावर असलेल्या परिस्थितीने त्यांनाही शहाणे केले आहे. ते कधी कुठलाही हट्ट करत नाहीत. काही मागत नाही. मात्र आपण मुलांसाठी काहीच करु शकत नाही ही टोचणी कायम मनाला सतावते. नुकतेच पैशांच्या अभावी वडिलांवर उपचार होऊ शकले नाही. आणि ते देवाघरी गेले. मात्र जाताना देखील त्यांना माझीच काळजी होती. शेवटी माझ्याच काळजीत ते गेले.

आता शासनाकडे तुमची काय मागणी आहे, यावर मायाताई म्हणतात, जे काही आहे ते समोरच आहे. दीड हजारावर गुजरान करणे फार अवघड आहे. आमचे वेतन वाढवावे. आम्हाला कायमस्वरुपी करावे. या दोनच मागण्या आहेत.

शासनाने संवेदनशीलता दाखवल्यास मायाताई आणि कमलाताई दोघींचेही आयुष्य पार बदलून जाईल.

लासूरच्या सरपंच मीना पांडव यांच्या घरी आम्ही पोहोचलो. गावात प्रत्येक व्यक्ती एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. मीना पांडव यादेखील माया साळवे, आणि कमला त्रिभुवन यांना आधीपासून ओळखतात. त्यांच्या अल्प वेतनाबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, आता महागाईचा काळ आहे. कमलाबाई आणि मायाताई या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगार आहे. याबाबत मी सरपंच या नात्याने ग्रामपंचायत मिटींगमध्ये ठराव मांडेल. आणि सर्वांच्या एकमताने यांचा पगार वाढवण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवू.

पोस्टमार्टमच्या क्षेत्रात आज अतिशय कमी महिला दिसतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तर महिलांचे काम करणेच मोठी गोष्ट असताना या क्षेत्रात महिलेचे बेधडकपणे वावरणे पाहून लोकांना आश्चर्य वाटते. मायाताई याविषयी म्हणतात, आजपर्यंत कोणी मला वाईट म्हटले नाही अथवा असे काम करते यासाठी झिडकारले नाही. मात्र प्रश्न पोटापाण्याचा आहे. लोकांना कौतुक वाटते. पण कौतुकाने पोट भरत नाही. जगण्यासाठी पैसा हवा असतो, असे म्हणत असताना मायाताईंचे डोळे वाजवीपेक्षा अधिक बोलत होते. डोळ्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या अश्रूंना त्यांनी पापण्यांच्या काठावरच अडवले.

महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा उदोउदो होत असताना लासूर गावातल्या या दोघीजणी मात्र पुरस्कारापासून, कौतुक सोहळ्यापासून दूर आपल्याच विवंचनेत अडकलेल्या आहेत. यांची परिस्थिती बदलेल का? हा एक प्रश्न शेवटी कायम राहतो.

बातम्या आणखी आहेत...