आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एखाद्या व्यक्तीमध्ये समाज सुधारण्याचे झपाटलेपण किती असू शकते, हे पुण्यातील नंदिनी जाधव यांच्याकडे पाहिल्यास लक्षात येईल. ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी स्वत:ला ‘जटमुक्ती’च्या चळवळीसाठी अक्षरश: वाहून घेतले.
झपाटल्यासारखे काम करीत केवळ ५ वर्षांतच त्यांनी राज्यातील १९१ स्त्रियांना ‘जट’ मुक्त केले. कोवळ डोक्यावरच नव्हे, तर मेंदूवरही वर्षानुवर्षे अंधश्रद्धेचं जंजाळ वागवणाऱ्या भगिनींना त्यातून सोडवण्यासाठी झटणाऱ्या नंदिनी यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
झारखंडच्या छुटनीदेवी यांनी ६२ स्त्रियांना चेटकीण प्रथेतून मुक्त केल्याबद्दल त्यांना यंदा ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले. त्याच धर्तीवर अंधश्रद्धेतून महिलांचे होणारे शोषण संपवण्यासाठी नंदिनीही काम करत आहेत. पुण्यासारख्या शहरात २० वर्षे व्यावसायिक ब्यूटीपार्लर चालवणाऱ्या नंदिनी २०१२ च्या सुमारास अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपर्कात आल्या. नंदिनी यांच्यात असलेली धाडसी वृत्ती आणि कौशल्य डॉ. दाभोलकरांच्या दृष्टीतून सुटले नाही. त्यांनी अंनिसची पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करण्याचा आग्रह केला. ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. या घटनेनंतर नंदिनी अंनिसच्या कार्यकर्ती म्हणून अधिक सक्रिय झाल्या. सध्या अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. राज्यातील १६ जिल्ह्यांत आठ हजार किलोमीटरचा प्रवास करीत त्यांनी १९१ महिला, तरुणींचे जटनिर्मूलन केले. पण, तिथे गेल्या आणि जट काढली, असे झाले नाही.
अनेक वेळा संघर्षाचा सामना, तर काही ठिकाणी ३-३ वर्षे समुपदेशन करून जट काढण्यात यश आले आहे. जट येणे म्हणजे देवीची कृपा नव्हे, तर अस्वच्छतेमुळे केसात निर्माण झालेला गुंता आहे, हे पटवून देण्यात त्यांनी शक्ती पणाला लावली. संयमाने समुपदेशन आणि वेळप्रसंगी कायद्याचा दट्ट्या दाखवून अंधश्रद्धेच्या जोखडातून त्यांनी अनेकींना मुक्त केले. राज्यभरातून महिला त्यांच्याकडे मदत मागतात अन् क्षणाचाही विलंब न लावता नंदिनी हजारो किलोमीटर पदरमोड करुन महिलांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी जातात. अंधश्रद्धाविरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी त्या ४९ दिवस २६ जिल्ह्यांत फिरत होत्या. यासोबतच तृतीयपंथी, देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठीही आणि मांत्रिक, बुवाबाजी वगैरेंमुळे महिलांचे होत असलेले शाेषण रोखण्यासाठीही त्या काम करतात. स्त्रियांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बळावण्यासाठी तीन हजार व्याख्यानेही त्यांनी दिली. यापुढे जाऊन नंदिनी यांनी अशा सर्व स्त्रियांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना १३ प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचाही प्रयत्न केला आहे.
‘जट’ मनातून काढण्याचे आव्हान
जट डोक्यावरून काढणे तसे सोपे, पण ती मनातून काढणे अत्यंत जिकिरीचे आहे. एकेका महिलेला समजावण्यासाठी वारंवार जाणे, संयमाने तिच्या शंकांचे निरसन करणे, जटांचे शास्त्रशुुद्ध कारण पटवून देणे, यांवर माझा भर असतो. आधी महिलेला आणि त्यापुढे जाऊन तिच्या कुटुंबातील व्यक्तींना तयार करणे हे मोठे आव्हान असते. कारण, महिलेची जट काढली तर कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू होईल, ही भीती घातलेली असते. मग, मृत्यू किंवा संकट नको म्हणून तिला कितीही त्रास होत असला, तरी जट सांभाळण्याची सक्ती केली जाते. - नंदिनी जाधव, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस
शारीरिक व मानसिक वेदना
अनेकींना जटांमुळे मेंदूत मुंग्या येणे, पाठीच्या मणके दुखणे असे त्रास तर होतातच, पण त्यातून येणाऱ्या उग्रवासामुळे कुणीही त्यांच्याजवळ येत नाही. भावनांना वाट करून देण्याचा मार्गही संपतो. त्यामुळे मनावर येणारा ताण आणि त्यातच पुढे नैराश्याच्या गर्तेतही त्या जातात. यातूनही काहींना अंगात येण्याचा प्रकार घडतो. हा देवीचा प्रकार नसून नैराश्यातून घडणारी कृती असल्याचे नंदिनी म्हणतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.