आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेरॉक क्रिकेट चषक स्पर्धा:वुडरिजची चाटे स्कूलवर मात, सरस्वती भुवन प्रशाला संघ विजयी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या आंतरशालेय व्हेरॉक क्रिकेट चषक स्पर्धेत वुडरीज हायस्कूल 'अ' संघाने विजय मिळवला. मंगळवारी झालेल्या सामन्यात वुडरीजने चाटे स्कूलवर 46 धावांनी मात केली. या खेळात हर्ष काळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून चाटे स्कूलने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वुडरीज संघाने 15 षटकांत 6 बाद 115 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीवीर मती पाटीलने 11 धावा केल्या.

दुसरा सलामीवीर हर्षित जोशी भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर आलेल्या हर्ष काळेने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी खेळी केली. त्याने 44 चेंडूंचा सामना करताना 11 सणसणीत चौकार खेचले, तर 2 उत्तुंग षटकार मारत 72 धावा ठोकल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या काढता आली नाही. पार्थ मुंदडा (6), रिषित (7), राजवीर मुळे (0) हे आल्यापावली तंबूत परतले. चाटेकडून केशव पांडेने 13 धावा देत 3 फलंदाज बाद केले. कौस्तुभ जोशी व ओम अकोलकरने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

चाटेची फलंदाजी ढेपाळली

प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना चाटे संघ निर्धारित षटकांत 6 बाद 69 धावा करु शकला. वुडरीजच्या गोलंदाजांनी चाटेच्या फलंदाजांना मोकळे खेळण्याची संधी न देता आपल्या चिवट गोलंदाजांनी बांधुन ठेवले. सुदर्शन बैनाडेच्या 14 धावा वगळता एकाही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. वुडरीजकडून रिषित व अथर्व देशमुख यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. पौरुष मिसाळ व निशाद जोशी यांनी एकाला टिपले.

ओमकार भवर ठरला सामनावीर

दुसऱ्या लढतीत सरस्वती भुवन प्रशालेच्या संघाने स्टेपिंग स्टोन स्कूलवर 9 गड्यांनी विजय मिळवला. या लढतीत ओमकार भवर सामनावीर ठरला. प्रथम खेळताना स्टेपिंग स्टोनने 15 षटकांत 7 बाद 72 धावा काढल्या. ओमकार भवरने अवघ्या 6 धावा देत 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरात सरस्वती भुवनने 13.3 षटकांत 1 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात कृष्णा पाटीलने 12, स्वराज कुलकर्णीने नाबाद 24 आणि कर्णधार श्रेयस जोशीने नाबाद 21 धावांची विजयी खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...