आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात:मुख्यमंत्री ठाकरेंनी ठणकावल्यानंतर नवीन जलयोजनेच्या कामाला मिळाली गती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन जलयोजनेच्या कामाला गती द्या, नसता कंत्राटदारावर कारवाई करा, असा इशारा दिला होता. त्यामुळे कंत्राटदाराने कामाला गती दिली. पैठण ते औरंगाबादपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी 2500 मिमीचे पाइप तयार केले आहे. कोटिंग करून हे पाईप पैठणला पाठवले जात आहे. सोमवार (ता. 6) पासून मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांनी दिली.

राज्य सरकारने शहरासाठी 1680 कोटी रुपयाची नवीन जलयोजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) मार्फत या योजनेचे काम केले जात आहे. एमजेपीने हैद्राबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला पहिल्या टप्प्यातील काम दिले आहे. जीव्हीपीआर कंपनीने नक्षत्रवाडी येथे कारखाना उभारुन त्यामध्ये मुख्य जलवाहिनीसाठी लागणार्‍या पाईपची निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे.

साडेसात मिटर लांब आणि साडेआठ मिटर व्यासाचे अवाढव्य पाईप तयार करून त्रयस्थ संस्थेकरवी त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोटिंगचे काम हाती घेण्यात आले. कोटिंगची देखील तपासणी करून संबंधित एजन्सीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी पाईप ट्रकमधून पैठणकडे पाठविले जात आहे. आतापर्यंत ७५० मिटरचे पाईप तयार केले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून हे काम बंद पडल्यागत पडून होते. याचे विशेष वृत्त आदर्श गावकरीने प्रकाशित करताच दुसर्‍याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कंत्राटदारासह एमजेपीच्या अधिकार्‍यांची बैठक घेत जलयोजनेच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले. कंत्राटदार कामास गती देत नसेल तर कारवाई करा, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले. त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली असून कंत्राटदाराने कामास गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

अधिकार्‍यांचे लक्ष

24 तास तीन शिफ्टमध्ये कारखानामध्ये पाईपचे उत्पादन केले जात आहे. पाईप उत्पादनाच्या कामाला गती देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, एमजेपीचे मुख्य अभियंता आर.एस. लोलापोड यांनी कारखान्यास भेट देऊन पाईप उत्पादनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

पैठणच्या यशवंतनगरातून कामाचा शुभारंभ

ट्रकमधून दोन दिवसात सहा पाईप पाठविले आहेत. पैठण मधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर असलेल्या यशवंतनगर येथून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी मशनरी नेण्यात आली आहे. रविवारी ही मशनरी बसविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...