आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Workers Died In Chember Due To Suffocation Aurangabad| Aurangabad Newsवॉचमनने पंधरा हजार देऊन चेंबरमध्ये उतरवले; गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू

धक्कादायक:वॉचमनने पंधरा हजार देऊन चेंबरमध्ये उतरवले; गुदमरून 3 कामगारांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाला कुठलीही माहिती न देता सलीम अली उद्यानात चेंबरमधील चोकअप काढण्यासाठी उतरवलेल्या तीन कामगारांचा सोमवारी सकाळी ११ वाजता विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला.

रावसाहेब सदाशिव घोरपडे (३५), अंकुश बाबासाहेब थोरात (३८), विष्णू गोविंद उगले (४५) अशी मृतांची नावे अाहेत. विलास विकास खरात (३१, सर्व रा. भीमराजनगर, हिमायतबाग) हा अत्यवस्थ असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. सोसायटीच्या वॉचमनने त्यांना १५ हजारांत हे काम दिले होते. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

एन-१२ परिसरातील उचभ्रू वसाहतीमध्ये ड्रेनेज चोकअप झाले हाेते. ते साफ करण्याचे काम किरण दाभाडे व अंकुश यांनी घेतले. रविवारी त्यांनी काम केले. परंतु संपूर्ण कॉलनीतील ड्रेनेजलाइन ब्लॉक असल्याने त्यांनी एका बंगल्याच्या पाठीमागील ड्रेनेजलाइन साफ करण्याचे काम मिळाले. सोमवारी सकाळी रावसाहेब, अंकुश, विकास आणि किरण ड्रेनेजच्या चेंबरमध्ये उतरले. त्यातच तिघांचा मृत्यू झाला.

वाढदिवसाला मुलासाठी आणायचा होता केक

मृत रावसाहेबला तीन मुले आहेत. सर्वात लहान मुलगा सहा वर्षांचा आहे. सोमवारी त्याचा वाढदिवस होता. माझ्या मित्रांसाठी संध्याकाळी येताना केक आणि खाऊ घेऊन या, असे त्याने वडिलांना सांगितले होते. मात्र, अचानक त्याच्यावर काळाने घाला घातला.

नियंत्रण कक्षातून अग्निशमनला माहिती

पोलिस नियंत्रण कक्षातून अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांनी आधी विष्णूला बाहेर काढले. त्यानंतर रावसाहेब तर शेवटी अंकुशला बाहेर काढण्यात यश आले. विलासवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

मनपाकडे सफाईच्या एक हजार तक्रारी

झोन कार्यालयात रोज ड्रेनेज चाेकअप झाल्याच्या चार तक्रारी येतात. महिनाभरात संपूर्ण शहरात मिळून सुमारे १००० तक्रारी येतात. महापालिकेकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. मात्र, मनपाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिक खासगी कामगारांना चेंबर सफाईसाठी बोलवतात. चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी उतरलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला होता. मुकुंदवाडी येथेही विसर्जन विहीर साफ करताना विषारी वायूमुळे दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. सफाईसाठी उतरलेले कामगार गुदमरून बेशुद्ध झाले. त्यांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आमच्याकडे कुठलीही तक्रार आली नाही

चेंबरमध्ये उतरलेल्या कामगारांचा मनपाशी काहीही संबंध नाही, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले. तर, मनपाकडे या सोसायटीची चेंबर चोकअपची तक्रार आली नसावी, अशी माहिती शहर अभियंता ए.बी. देशमुख आणि वाॅर्ड अधिकारी राहुल सूर्यवंशी यांनी दिली. या वाॅर्डाचे अभियंता फारुक खान यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

गुन्हा दाखल करावा

मृताच्या नातेवाइकांनी सिटी चौक पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते घाटीत दाखल झाले. या वेळी खासदार इम्तियाज जलील, लक्ष्मीनारायण बाखरिया, मोहन मेघवाले, बाळासाहेब थोरातही अाले. हे काम देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. शासनाच्या वतीने मृताच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी खासदार इम्तियाज यांच्यासह गौतम खरात यांनी केली.