आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्त पदांच्या प्रतीक्षेत:कामगार 500 चा रोजगार न बुडवता डॉक्टरांना देतात 200 रु.

संतोष उगले | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूजमधील हजाराे ईएसआयसीधारक कामगार दिवसभराचा रोजगार बुडवून ५०० रुपयांचे नुकसान करण्यापेक्षा खासगी रुग्णालयात २०० रुपयांत आराेग्य तपासणी आणि जेनेरिक मेडिकलमधून औषधी खरेदी करणे पसंत करतात. याशिवाय दररोज ३०० ते ५०० कामगार किंवा त्यांचे कुटुंबीय तासन‌्तास रांगेत उभे राहून ईएसआयसीच्या ओपीडीतून तपासणी करून घेतात.

वाळूज औद्योगिक परिसरातील लहान-मोठ्या ४,७०० उद्योगांत काम करणारे ईएसआयसीधारक १ लाख ७० हजार कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून सन २०१६ मध्ये पंढरपुरात ३ कोटी ९० लाख रुपये खर्चून ‘मॉडेल डिस्पेन्सरी’ उभारली. मात्र, सहा वर्षांचा कालावधी उलटूनही या ठिकाणी आजवर ना पुरेशी यंत्रसामग्री ना अधिकारी-कर्मचारी पुरवण्यात आले. मागील ७ वर्षांपासून केवळ एकच डॉक्टर पूर्णवेळ सेवा देताहेत.

उर्वरित चार पदे रिक्त होती. त्यातील दुसरे पद जानेवारी २०२१ मध्ये भरल्याने आता दोघांकडून ५०० रुग्णांची तपासणी केली जाते. जिथे प्रत्यक्षात ५ डॉक्टर अपेक्षित होते. डॉक्टरांप्रमाणेच क्लर्क, नर्स व इतरही स्टाफ कमी असल्याने त्याचा थेट परिणाम रुग्णांना सेवा देतेवेळी होतो. त्यातून अनेकदा संतप्त रुग्ण व डॉक्टरांमध्ये वादही होतात. परिसरातील पाच खासगी रुग्णालये टायअप केली आहेत. मात्र, तिथेही नोंदणी प्रक्रिया व इतर अडचणी येतात, त्यामुळेसुद्धा कामगार खासगी हाॅस्पिटलमध्ये जाऊनच उपचार घेणे पसंत करतात.

करोडो रुपये खर्च करून भव्य इमारत उभारली, पण सुविधाच नाहीत
या मॉडेल डिस्पेन्सरीमध्ये एक्स-रे मशीन, सुसज्ज लॅब व इतरही अनेक सुविधा कामगारांना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच करोडो रुपये खर्च करून भव्य इमारत उभारली. पण या ठिकाणी कुठल्याही वस्तू, लॅब, पुरेसे मनुष्यबळ शासन उपलब्ध करून देत नसल्याने नुसतीच येथे भव्य इमारत उभीआहे.

रिक्त जागा भरा, अन्यथा आंदोलन
तीनमजली इमारतीवर प्रतिवर्षी ५० लाख रुपयांपेक्षा आधिक पैसे डागडुजीवर खर्च होताे. परंतु, येथे स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह इतर सुविधाही दिल्या जात नाहीत. शासनाने तत्काळ सुविधा न पुरवल्यासआणि रिक्त पदे न भरल्यास हजारो कामगार तीव्रआंदाेलन करण्याच्या पवित्र्यातआहेत.

बातम्या आणखी आहेत...