आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक पर्यावरण दिन विशेष:कोरोना मृतांसाठी 15 महिन्यांत लागले दीड लाख झाडांचे लाकूड

औरंगाबाद16 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • 4 हजार टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात, वर्षाकाठी 100 चौकिमी जंगल नष्ट

पारंपरिक पद्धतीच्या अंत्यसंस्काराने एका व्यक्तीला “मोक्ष’ मिळवून देण्यासाठी दोन झाडांना जीव द्यावा लागतो. एका अंत्यसंस्कारासाठी चार क्विंटल लाकूड लागते. यामुुळे देशात वर्षाकाठी १०० चौरस किलोमीटर जंगल नष्ट होते. राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी १५ महिन्यांत १.५४ लाख झाडे कापावी लागली. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची गरज पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) २०१६ मध्ये दाखल याचिकेतील माहितीप्रमाणे देशात दरवर्षी ८० लाख मृतदेहांवर दहन पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. एका अंत्यसंंस्कारासाठी सरासरी ४ क्विंटल लाकूड लागते. ८० लाख मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी ३.२ कोटी क्विंटल लाकडाची गरज भासते. चार क्विंटल लाकूड मिळवण्यासाठी १५ वर्षे वयाची २ झाडे कापावी लागतात. म्हणजेच ८० लाख मृतदेहांसाठी वर्षाकाठी सरासरी १.६ कोटी झाडांची गरज पडते. ही झाडे मिळवण्यासाठी १०० चौरस किलाेमीटरवरील जंगल नष्ट होते. एवढे मृतदेह जाळल्याने ९० लाख टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात उत्सर्जित होतो, तर सुमारे ५ लाख टन राख तयार होते. यापैकी ५० टक्के नदीत टाकली जाते, अशी माहिती नागपूरच्या इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे विजय लिमये यांनी दिली. पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा पर्याय

मोक्षकाष्ठ : विजय लिमये यांनी अंत्यसंस्कारासाठी बायोमास ब्रिकेट्सचा पर्याय शोधलाय. शेतातील पीक काढल्यावर उरलेला कचरा म्हणजे तुऱ्हाटी, पऱ्हाटी ते एकरी २ हजार रुपये दराने शेतकऱ्यांकडून विकत घेतात. त्यापासून २ ते ४ फुटांचे ओंडके म्हणजे ब्रिकेट्स तयार करतात.

१.५४ लाख झाडांचा बळी
- राज्यात ३ जून २०२१ पर्यंत कोरोनामुळे ९६७५१ मृत्यू झाले. पैकी २० टक्के मृतांवर दफनविधी झाला तर दहन पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी ७७ हजार मृतदेहांवर प्रत्येकी २ प्रमाणे अंत्यसंस्कारासाठी १,५४,००० झाडांची लाकडे लागली.
- यातून ८५ हजार टन कर्ब वायू, तर ४८३८ टन राख निघाली. औरंगाबादमध्ये ३ जूनपर्यंत कोरोनामुळे ३२२७ मृत्यू झाले. पैकी सुमारे ८० टक्के म्हणजे २५८७ मृतदेहांच्या दहनासाठी ५१७४ झाडे कापावी लागली. त्यातून ३२०० टन कर्ब वायू आणि १६० टन राख निघाली.

कमी प्रदूषण, शेतकऱ्यांना मोबदला, राेजगारनिर्मिती
इलेक्ट्रिक, गॅसदाहिनीतील अंत्यसंस्कारात भावना राहत नाहीत. मोक्षकाष्ठमध्ये पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्काराच्या भावना असतात. लाकडापेक्षा कमी खर्च, कमी प्रदूषण, शेतकऱ्यांना मोबदला आणि रोजगार निर्मितीही होते. -विजय लिमये, नागपूर

हरित शवदाह : दिल्लीतील मोक्षदा पर्यावरण समितीने पर्यावरणपूरक मोक्षदा हरित शवदाह यंत्र तयार केले. तीन बाजूने बंद धातूच्या प्लॅटफॉर्मवर मृतदेह ठेवला जातो. आगीमुळे धातू गरम होतो आणि २ तासांत दहन होते. धूर कमी व ८० ते ९०% लाकडाची बचत होते.

एनजीटी, न्यायालयाचे ताशेरे : राष्ट्रीय हरित लवादाने २०१६ मध्ये केंद्र आणि दिल्ली सरकारला अंत्यसंस्कारासाठी वीज व गॅसदाहिनी बसवण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्याची सूचना केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका सुनावणीदरम्यान विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्काराचा सल्ला दिला होता.

बातम्या आणखी आहेत...