आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक चिमणी दिन:स्पॅरोमॅनने 14 हजार घरांत पोहोचवला चिमण्यांसाठी हक्काचा निवारा

औरंगाबाद / रवींद्र डोंगरेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘घर तिथे घरटी’ उपक्रम : चिवचिवाटाचे रेकाॅर्डिंग ऐकून घरट्यात येतात चिमण्या

वाढते शहरीकरण, वायू प्रदूषण, मोबाइल टॉवरची घातक किरणे आदींमुळे शहरी भागांत चिमण्यांची संख्या घटत चालली आहे. जिथे दाट झाडे आहेत, तिथेच त्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. चिमण्यांवर संकटाची वेळ आलेली असताना औरंगाबाद शहरातील ‘स्पॅरोमॅन’ म्हणून ओळख असणाऱ्या संदीप भाले या तरुणाने १४ हजार चिमण्यांची घरटी मोफत वितरित केली आहेत. तो लाकडापासून घरच्या घरीच ही घरटी बनवतो आणि एका व्यक्तीला एक याप्रमाणे मोफत देतो.

चिमण्या वाचवण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करणारे अनेक पर्यावरणप्रेमी पुढाकार घेत आहेत. त्यापैकी संदीप भाले एक आहेत. यासाठी त्यांनी ‘एचटूओ अँड सॉइल एनव्हायर्नमेंट रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी २०१९ मध्ये ‘घर तिथे घरटी’ हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्यांनी घरटी विकत आणून त्यांचे लोकांना वितरण केले. मात्र, ते खर्चिक असल्याने त्यांनी स्वत:च घरटी तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी खास प्रशिक्षणही घेतले व घरटी बनवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना सुमीत भाले, आनंद लंगोटे, नितीन सोनगीरकर यांचे सहकार्य असते.

असे आहे कृत्रिम घरटे }६ सेंमी गोल मध्यभाग, १२ सेंमी उंच व १४ सेंमी लांबीच्या आकर्षक डिझाइनमध्ये हे लाकडी घरटे तयार होते. भाले यांनी ५ लिटर तेलाच्या कॅनपासूनही घरटे तयार केले. अंगणात किंवा इतर ठिकाणी ते लावल्यावर यूट्यूबवरील ‘कॉल ऑफ अ हाऊस स्पॅरो’ हा व्हिडिअो डाऊनलोड करावा. हा चिवचिवाट रोज सकाळी एक मिनिट वाजवावा. ८-१० दिवसांनंतर चिमण्यांची वर्दळ सुरू होईल व त्या घरट्यात राहायला येतील, असे भाले यांनी सांगितले.

चिमण्यांबाबत जनजागृती
चिमण्या झाडांवर घरटे करत नाहीत. त्या मोठ्या छिद्रामध्ये, बाल्कनीत, कोपऱ्यात किंवा दोन भिंतींमधील जागेत घरटे करतात. मात्र, शहरीकरणामुळे पारंपरिक घराऐवजी बॉक्स टाइप फ्लॅट व काचेच्या इमारती उभ्या राहिल्याने चिमण्यांना जागा शिल्लक नाही. त्यासाठी भाले यांनी कृत्रिम घरट्यांची संकल्पना रुजवली. या अभियानात संस्थेची टीम शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांत जाऊन जनजागृती करते.

बातम्या आणखी आहेत...