आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक जल दिन:मुबलक पाणी सोडाच, वाळवंटाच्या दिशेने वाटचाल; मराठवाड्यासाठी ‘मृगजळ दिवस’च!

औरंगाबाद / महेश जोशीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी नदी ही मराठवाड्याची भाग्यरेषा, तर जायकवाडी धरण ही जीवनरेषा. जायकवाडीवरच मराठवाडा प्रगतीचे स्वप्न बघत आला आहे. मात्र, चुकीची जलविकास धोरणे, नवनवीन योजनांचे गाजर व अंमलबजावणीतील दुष्काळामुळे मुबलक पाणी तर दूर, पण मराठवाड्याची वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ८५% कोरडवाहू शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्याकडे ढकलला जात आहे. यामुळेच आज जग जल दिन साजरा करत असताना मराठवाड्यासाठी मात्र हा “मृग’जल दिवसच ठरणार आहे. जायकवाडीतील पाणी उपलब्धतेचा अभ्यास करण्यासाठी २००१ मध्ये एक समिती स्थापन झाली होती. या धरणाची क्षमता १९६.५० अब्ज घनफूट (टीएमसी) होती. मात्र, नवीन अभ्यास आणि बदललेल्या परिमाणानुसार जायकवाडी धरणापर्यंतची पाणी उपलब्धता १५७.२० टीएमसी असल्याचे समितीने २००४ मध्ये दिलेल्या अहवालात सांगितले. त्यावर “सीडीओ-मेरी’ नेही शिक्कामोर्तब केले. येथूनच मराठवाडा आणि नगर-नाशिक यांच्यात पाण्यावरून वादाला सुरुवात झाली. ८१ टीएमसी पाणीहक्क हा उणे टीएमसी बनला आहे. यामुळे महापूर आला तरच मराठवाड्याला पाणी मिळणार, अन्यथा नगर-नाशिकच्या दयेवर विसंबून राहण्याचीच वेळ येईल.

मृगजळ-१ : वरच्या पात्रात मनाई, तरी नवीन धरणे बांधली
जायकवाडीच्या वरच्या पात्रात धरणे बांधण्यास मनाई करण्यात आली, तरी नगर-नाशिकने जायकवाडीच्या १५७.२० टीएमसी पाण्यापैकी १४३.८७ टीएमसी क्षमतेची धरणे बांधली. केवळ १३ टीएमसी पाणी उरले. तर नगर-नाशिक बिगर सिंचनासाठी २८.९७ टीएमसी पाण्याचा वापर करते. म्हणजेच त्र्यंबकेश्वर ते जायकवाडी या ऊर्ध्व गोदावरी उपखाेऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणीही वजा झाले.

मृगजळ-२ : धरणे असतानाही २९ टीएमसी पाणी वाया
१४६५ किलोमीटरची गोदावरी ५ राज्यांतून वाहते. देशातील ही सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. पाच राज्यांच्या लवादाने मराठवाड्यातील मध्य गोदावरी उपखाेऱ्यासाठी १०२ टीएमसी पाणी दिले. पाटबंधारे खात्याने हे पाणी साठवण्यासाठी १०५ टीएमसी क्षमतेची धरणे बांधली. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि चुकीच्या नियोजनामुळे यात महापूर आला तरीही केवळ ७३ टीएमसी पाणी साठवले जाते. उर्वरित २८.८५ टीएमसी पाणी वाहून जाते. कितीही पाऊस पडला तरी केवळ ७१ टक्के पाणी साठणार, तर २९ टक्के वाहून जाणार. यावर्षी मध्य गोदावरी उपखोऱ्यातून ८३ टीएमसी पाणी वाहून गेले. आता या २८.८५ टीएमसी पाण्याची साठवणूक करण्यासाठी नवीन धरणे बांधण्याची योजना बांधकामप्रवण जल प्रशासनाने प्रस्तावित केले आहे.

मृगजळ-३ : पाण्याची हेराफेरी
नवीन पाणी येणे तर दूरच, त्या पाण्यात हेराफेरी करण्यात कोणतीच कसर जलसंपदा विभाग सोडत नाही. १२ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयातून ही बाब स्पष्ट होते. ४०० कोटींची रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजना बंद पडली. ती पुन्हा कार्यान्वित होणार नाही हे समजून २००९ मध्ये याचे पाणी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना भाग -२ ला पाणी दिले. यासाठी नव्याने २२२ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. यानंतर १२ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयात पैठण डावा कालवा, उजवा कालवा, माजलगाव धरण तसेच बाष्पीभवनाचे पाणी कमी केले. तर ब्रह्मगव्हाण टप्पा १,२,३, ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा १,२ व पुन्हा रामकृष्ण गोदावरी योजना आणि श्रीदत्त सहकारी उपसा सिंचन योजनेला पाणी दिले.

मृगजळ-४ : उजणीचा चकवा
उजणी धरणातून कृष्णा मराठवाडा प्रकल्पाद्वारे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, यापैकी १४ टीएमसी पाणी कर्नाटकाच्या पोलावरम धरणाच्या खालच्या भागात आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा वाद मिटल्याशिवाय हे पाणी मिळू शकत नाही. यामुळे सध्याा उर्वरित ७ टीएमसी पाण्यावरच योजना सुरू आहेत.

मृगजळ-५ : पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी
सर्व बाजूने मराठवाड्याची पाणीकोंडी झाल्यावर पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचे मृगजळ दाखवणे सुरू झाले. २००४ च्या अभ्यासानुसार जायकवाडीला पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी १६८ टीएमसी मिळू शकते. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात योजना मूर्त रूपात येण्याची तयारीत असताना मुंबई शहराच्या भविष्यातील पाण्याचा प्रश्न समोर आला. यावर अभ्यास करणाऱ्या समितीने १९ सप्टेंबर २०१९ रोजी दिलेल्या अहवालात मुंबईसाठी ८०.२ टीएमसी पाण्याची गरज भासणार असल्याने केवळ ८७.८० टीएमसी पाणीच जायकवाडीला देता येईल, असे सांगितले. दुसऱ्या एका समितीने ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी दिलेल्या अहवालात केवळ ६६.०२ टीएमसी पाणी देणे शक्य असल्याचे सांगितले. पैकी ७.४० टीएमसी पाणी प्रवाही योजना करून गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे ठरले.

मृगजळ-६ : प. वाहिन्यांच्या मंजुरीआधी धरणांना मंजुरी
प्रत्यक्षात पश्चिम वाहिन्या नद्यांच्या ७.४० टीएमसी पैकी आजघडीला सर्वेक्षणानंतर केवळ ३.४२ टीएमसी पाण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. मात्र, याच्या अंमलबजावणीतही जल आराखड्यातील तरतुदी अडचणीच्या ठरणार आहेत. सर्वात मोठी अडचण म्हणजे ज्या भागात हेक्टरी ८००० दलघमी पाणी पडते तेथूनच हे पाणी वळवता येते. तर ज्या भागात हेक्टरी ३००० दलघमी पाणी मिळते तेथे पाणी वळवता येते. या दोन्ही अटीत मराठवाडा बसत नाही. ही अट बदलण्यासाठी जल आराखड्यात बदल करावे लागतील. ३.४२ टीएमसी पाण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याआधी नगर-नाशिकने २५ लघुपाटबंधारे याेजनांना मंजुरी देऊन टाकली आहे. घाटघर प्रकल्पातून ०.२५ टीएमसी पाणी उचलण्याची योजना होती. तेथेही ६ लघुपाटबंधारे योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मराठवाड्यापर्यंत पाणी कसे व कधी मिळणार हा प्रश्न निर्माण होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...