आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:दहावीचा निकाल 96.94%; 12 हजार 210 शाळांचा निकाल शंभर टक्के, कोकण विभाग राज्यामध्ये अव्वल

औरंगाबाद \ पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. नऊ विभागांच्या तुलनेत कोकणचा सर्वाधिक ९९.२७ टक्के निकाल लागला आहे, तर नाशिक विभागाचा सर्वात कमी ९५.९० टक्के निकाल आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.९६ असून ९६.०६ टक्के मुले पास झाले आहेत. मुलांच्या तुलनेत १.९० टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, २२ हजार ९११ पैकी १२ हजार २१० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गणितात सर्वाधिक ३४ हजार ९४२ विद्यार्थी नापास झाले असून १५ लाख ३८ हजार १३८ विद्यार्थी सामाजिक शास्त्रात पास झाले आहेत.

शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान घेण्यात आली होती. १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार २७१ विद्यार्थी तर ७ लाख ९ हजार, ९६४ विद्यार्थिनींचा समावेश होता. मागील वर्षी सरासरीच्या आधारे निकाल जाहीर केला होता. यंदा मात्र २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची होम सेंटरवर परीक्षा घेतली गेली. त्यासाठी ५ हजार ५० मुख्य केंद्रे तर १६ हजार ३३४ उपकेंद्रे दिली होती. राज्यात शंभर टक्के गुण मिळवणारे १२२ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये लातूर पॅटर्न अशी ओळख असलेल्या लातूर विभागात सर्वाधिक ७० विद्यार्थी शंभरीपार आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर-१८, औरंगाबाद-१८, अमरावती-८, पुणे-५, मुंबई, कोकण आणि नाशिक विभागातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याने शंभर टक्के मार्क घेतले आहेत. कोरोनामुळे २०२१ मधील परीक्षा रद्द करून सरासरीच्या आधारे ९९.९५ टक्के निकाल जाहीर केला होता. २०२० मध्ये दहावीची परीक्षा झाली होती. त्या वेळी निकालाची टक्केवारी ९५.३० होती. यंदाचा निकाल १. ६४ टक्यांनी वाढला आहे.

-९९.२७ टक्के निकालासह कोकण विभाग राज्यामध्ये अव्वल -९५.९० टक्क्यांसह नाशिकचा लागला सर्वात कमी निकाल -मुलांच्या तुलनेत १.९० टक्के गुण घेऊन मुली अधिक उत्तीर्ण -१२२ गुणवंतांना आऊट ऑफ मार्क, लातुरात सर्वाधिक ७० जण

दिव्य मराठी विश्लेषण । दहावीनंतर आयटीआय, अकरावीसह इतर पर्याय
66 विषयांची परीक्षा । 08 माध्यमे
112 गैरमार्गाचा अवलंब केल्याची नोंद
94.40% दिव्यांगांचा निकाल
24 विषयांचा निकाल शंभर टक्के

राज्यभरात एकूण १ लाख ६४ हजार ७९८ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले
-चित्रकला : १ लाख २८ हजार ७४१ -क्रीडा : १५ हजार ५३० -स्काऊट गाइड : ५४२ -नाट्य : ७ -लोककला : १४ हजार ५४९ -शास्त्रीय नृत्य : १९४९ -शास्त्रीय गायन : २०३६ या विषयांचा समावेश

विभागवार निकाल
पुणे 96.96%
नागपूर 97.00%
औरंगाबाद 96.33%
मुंबई 96.94%
कोल्हापूर 98.50%
अमरावती 96.81%
नाशिक 95.90%
लातूर 97.27%
कोकण 99.27%

स्पर्धा परीक्षांसाठी कला शाखा उत्तम पर्याय
औरंगाबाद

दहावीतील गुणवंत विद्यार्थी व पालकांसाठी दैनिक ‘दिव्य मराठी’ने तीन तज्ज्ञांकडून निकालाचा अन्वयार्थ जाणून घेतला. दोन वर्षे कोरोनामुळे शिक्षण ऑनलाइन होते. याचा बराचसा परिणाम जाणवत आहे. मात्र, आता पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देऊन त्यांचा नेमका कल कुठल्या क्षेत्रात आहे, हे प्रामुख्याने पाहावे, असेही तज्ज्ञांनी या वेळी सांगितले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र असे विषय घेऊन अकरावीला प्रवेश घ्यावा. यामुळे परीक्षा देताना याचा फायदा होता. बारावीनंतर नीट, जेईई सारख्या परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांनी आधीपासून तयारी करावी. यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल. दहावीनंतर विद्यार्थ्यांनी वाचनावर भर द्यावा. यामध्ये वृत्तपत्र आणि इतर ज्ञानार्जनाचे पुस्तके वाचावीत.

दिव्य मराठी एक्स्पर्ट पॅनल
एस. वाय. शेख
माजी प्राचार्य, शासकीय आयटीआय, औरंगाबाद
डॉ. विद्या प्रधान
उपप्राचार्य, रफिक झकेरिया महिला कॉलेज
आर. बी. गरुड
माजी उपप्राचार्य, देवगिरी कनिष्ठ महाविद्यालय

बातम्या आणखी आहेत...