आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाणीटंचाईविषयी २ जून रोजी मुंबईत आढावा बैठक घेतली. ८ जूनला जाहीर सभेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तरी १७ लाख औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला नाहीच. त्यातच औरंगाबादेतील पाणी प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीच सोडवू शकतात, असे वक्तव्य १४ जून रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यामुळे मुख्यमंत्री १७ जून रोजी पुन्हा ऑनलाइन आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय धावपळ सुरू झाली. सध्या औरंगाबादला दररोज किमान २०० एमएलडी पाणी लागते. काहीही केले तरी सध्याच्या जलवाहिनीतून शहरामध्ये एवढे पाणी आणता येणार नाही. ६४ एमएलडीची (दशलक्ष लिटर) तूट भरून काढणे कठीण आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांना कशी समजावून सांगावी, असा यक्ष प्रश्न मनपाच्या अधिकाऱ्यांपुढे आहे.
पाण्यासाठी मार्च, एप्रिल महिन्यात मोठी आंदोलने झाली. २३ मे रोजी भाजपने जलआक्रोश मोर्चा काढला. त्यामुळे आमचेच हिंदुत्व खरे हे सांगण्यासाठी औरंगाबादेत घेतलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांना पाण्याविषयी बोलावे लागले. त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. त्यानुसार उपाययोजना होत आहेत. मात्र, मुबलक पाणी किमान एक दिवसाआड लोकांना मिळणे महत्त्वाचे आहे. ते सध्यातरी होत नसून शेकडो वसाहतींना आठ दिवसांआड पुरवठा होत आहे.
पुढील काही महिन्यांत पाच दिवसांआड पाणी एवढा फरक पडू शकतो. पण त्याने १७ लाख औरंगाबादकरांचे समाधान होणे अशक्य आहे. ही बाब हेरून राज्यपालांनी पाणी प्रश्न थेट राष्ट्रीय पातळीवर नेला. याबद्दल शिवसेना, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी राज्यपाल, भाजपवर आगपाखड केली असली तरी मुबलक पाणी नाही. त्यामुळे लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असे शिवसेनेतील एका गटाचे म्हणणे आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच मनपा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या पाणीपुरवठा योजनेत काही सुधारणा करून पाणीपुरवठा सुरळीत करणे, १६८० कोटींच्या नव्या पाणी योजनेचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.
हर्सूलच्या वाढीव पाण्याची नुसतीच चर्चा, अजून घरापर्यंत येईना
हर्सूल तलावात ७०० मिमीची पाइपलाइन टाकून १० एमएलडीपर्यंत उपसा वाढवण्याचे प्रयत्न महिनाभरापासून सुरू आहेत. पण त्याला यश आलेले नाही. जायकवाडीतून १३६ एमएलडी पाणी येते, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ११० ते ११५ एमएलडीच पाणी शहरापर्यंत पोहोचते. त्यामुळे तूट ६४ नव्हे तर ८४ एमएलडीची आहे, असे अधिकारीच सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.