आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधू फरार:‘तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकीट काढा, मी खायला घेऊन येते’ म्हणत नववधू अंगावरील दागिन्यांसह पसार, खुलताबादमधील तरुणाला साडेतीन लाखांचा गंडा

खुलताबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न लागल्यानंतर पाचव्या दिवशी नववधू तीन लाखांवरील दागिने घेऊन पसार झाली. दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी जोडपे गेले. पतीला किल्ल्यात जाण्यासाठी तिकीट काढा असे सांगितले, तोपर्यंत आपण काहीतरी खाद्यपदार्थ आणतो, असे सांगून नववधू गेली ती परत आलीच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील शेलूद गावात लग्न लागल्यानंतर तिसऱ्या दिवशी नववधूने १ एप्रिल रोजी दागिन्यांसह पोबारा केल्याची घटना घडली होती.

खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील रहिवासी प्रकाश लाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा राजेश प्रकाश लाटे (२६) याचा २६ मार्च रोजी शुभांगी प्रभाकर शिंदे या तरुणीसोबत मावसाळा येथे थाटामाटात विवाह झाला. तीन दिवसांनंतर सत्यनारायणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेव राजेश व नववधू शुभांगी हे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेले. शुभांगीने राजेशला “तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकीट काढा, मी काही खाण्याचे पदार्थ खरेदी करते,’ असे सांगितले. बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेथील दुकानदारांना विचारपूस केली तेव्ही ती एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. नंतर राजेशने दौलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. सोयरीक जुळवण्यासाठी दलालांनी १ लाख ४१ हजारांना गंडवले; नांदेड, जळगाव येथील दलालांनी फसवले

अशी जुळली होती सोयरीक
राजेश वाळूज येथील एका कंपनीत काम करतो. त्याच कंपनीतील नांदेड येथील महिलेने तिच्या वडिलांना फोन करून राजेशला मुलगी शोधा असे सांगितले. त्यांनी लग्न जुळवून देणाऱ्या कदम नावाच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर दिला. कदमने नांदेड येथील रामप्रसाद डांगे नावाच्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. रामप्रसादने जळगाव येथील बबन म्हस्के यांच्यासोबत ओळख करून दिली. यानंतर आशाबाई भोरे या महिलेसोबत ओळख झाली. शेवटी बबन म्हस्के व आशाबाई भोरे यांनी सोयरीक जुळवली.

नववधूने पळवलेले दागिने असे
१८ हजारांची मण्यांची सोन्याची पोत, ८,५०० रुपयांचे दीड ग्रॅमचे मंगळसूत्र, ८ हजारांचे कानातले, ४ हजार ७०० रुपयांची पायातील चांदीची चेन आदी मुद्देमाल घेऊन नववधूने पोबारा केला. संपूर्ण तीन ते साडेतीन लाखाला प्रकाश लाटे लुटले गेल्याचे त्यांनी सांगितले. चार महिन्यांपूर्वी खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथे लग्नाच्या नावाखाली एकास लाखो रुपयांना लुटले होते.

जळगावला बोलावून ठरवले लग्न
प्रकाश लाटे यांच्याशी दलालांची ओळख झाल्यावर दलाल बबन म्हस्के व आशाबाई भोरे एक मुलगी सोबत घेऊन २१ मार्च रोजी मावसाळा येथे मुलगा पाहण्यासाठी आले. यादरम्यान देण्या-घेण्याचे ठरल्यानंतर प्रकाश लाटे व इतरांना जळगाव येथे बोलावले. २२ मार्च रोजी मुलाचे वडील प्रकाश लाटे व माजी सरपंच तुळशीराम घाटे हे जळगाव शहरातील एमआयडीसी भागातील साईनगर येथे गेले. तेथे सोयरीक व लग्न ठरले.

ओळखी करून देण्यासाठी लुबाडले
कदम दलालाने रामप्रसादसोबत ओळख करून देण्यासाठी मुलाचे वडील प्रकाश लाटे यांच्याकडून ५,५०० रुपये घेतले. रामप्रसादने बबन म्हस्केसोबत ओळख करून देण्यासाठी ३ हजार रुपये घेतले. बबन म्हस्के यांनी आशाबाई भोरेसोबत ओळख करून देण्यासाठी ३ हजार घेतले. आशाबाई भोरे व बबन म्हस्के यांनी सोयरीक जुळवण्यास १ लाख ३० हजार घेतले, असे प्रकाश लाटे यांच्याकडून १ लाख ४१ हजार ५०० रुपये गंडा घातला.

बातम्या आणखी आहेत...