आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:राहोली बुद्रुक येथे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने आला होता मानसिक ताण

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील राहोली  बुद्रुक येथे ४० वर्षीय तरुण शेतकऱ्याने तीनवेळा सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नसल्याने मानसिक ताणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी (ता. १८) हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील राहोली बुद्रुक येथे विठ्ठल बाबाराव डोरले (४०) यांना त्यांच्या मालकीची एक एकर शेती आहे. घरी पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी गावातील एका व्यक्तीची पाच एकर शेती बटाईने केली होती. यावर्षी मृग नक्षत्रावर दमदार पाऊस झाला असल्याने हंगाम चांगला येईल अशी अपेक्षा होती. मात्र पेरणी केलेले बियाणे पहिल्यावेळी उगवलेच नाही. त्यानंतर त्यांनी उधार उसनवार करून दुसऱ्या वेळेस पेरणी केली मात्र ती पेरणी वाया गेली. तर तिसऱ्या वेळी पेरणी केलेले बियाणे हि निघाले नाही. तसेच पावसामुळे  शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे ते अस्वस्थ होते. शुक्रवारी ता. १७ रात्री जेवण झाल्यानंतर ते झोपी गेले. मात्र पहाटे ते घरात नसल्याचे लक्ष येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह घरालगत असलेल्या पडीत जागेतील पत्र्याच्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

 या घटनेची माहिती संतोष डोरले यांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली. त्यावरून  उपनिरीक्षक राहुल तायडे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.