आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:झुनझुनवाडीतांडा शिवारात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, दोन वेळेस पेरलेले बियाणे न उगवल्याने मानसिक ताण

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील झुनझुनवाडी तांडा शिवारामध्ये तरुण शेतकऱ्याने दोन वेळेस पेरलेले बियाणे उगवले नसल्यामुळे मानसिक ताण आल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. २२) रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील झुनझुनवाडीतांडा येथील अजय बाबुराव पवार ( २४ ) यांच्याकडे चार एकर शेत आहे. घरी आई, वडील, पत्नी व लहान भाऊ यांचा उदरनिर्वाह या शेतावरच चालतो. चार एकर शेतामधून पारंपरिक पिके घेतली जातात. या वर्षी मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाल्यामुळे पवार यांनी मृग नक्षत्रामध्ये सोयाबीनची पेरणी केली. मात्र सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे त्यांनी उधार उसनवार करून  दुसऱ्या वेळेस पेरणीसाठी बियाणे उपलब्ध केले. सोयाबीन सोबत खताची ही त्यांनी पेरणी केली. मात्र दुसर्‍या वेळी पेरणी केलेले बियाणे देखील उगवले नाही त्यामुळे दुकानदारांचे देणे कसे द्यावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. यामुळे मागील काही दिवसापासून ते अस्वस्थ होते.

दरम्यान मंगळवारी (ता. २१) रात्री जेवण करून ते घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी झुनझुनवाडीतांडा शिवारातील वन विभागाच्या जंगलात जाऊन गळफास घेतला. रात्री उशिरापर्यंत  पवार घरी न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. बुधवारी  जंगलात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

 या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत हुंडेकर, जमादार शेख बाबर प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सुदाम पवार यांच्या माहितीवरून आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.