आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:लिंबाळातांडा येथे तरुण शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान, ऊसतोडीला जाण्याचेही केले राहित

हिंगोली2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील लिंबाळातांडा येथे सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने तरुण शेतकरी विजय बन्सी आडे (३०) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाळातांडा येथील विजय बन्सी आडे (३०) यांना दोन एकर शेत आहे. या शेतावर आई, पत्नी, दोन मुलांचा उदरनिर्वाह सुरु होता. खरीप हंगामात सोयाबीनचे पिक काढल्यानंतर आडे पती-पत्नी ऊसतोडीच्या कामाला जात होते. त्यामुळे कसाबसा उदरनिर्वाह होत होता.

यावर्षी शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीन काढल्यानंतर ऊसतोडीला जाऊ असे त्यांनी कुटुंबाला सांगितले होते. मात्र सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनच्या उभ्या पिकाला कोंबे फुटल्याने उत्पादन येणार तरी कसे असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे विजय आडे मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. तर ऊसतोडीला जाण्याचेही त्यांनी रहित केले.

दरम्यान, गुरुवारी (ता.१५) दुपारच्या सुमारास घरीच त्यांनी विषारी औषध पिले. एक ते दिड तासाने घरातून विषारी औषधाचा वास येत असल्याने शेजाऱ्यांनी पाहिले. त्यामध्ये विजय यांनी विषारी औषध पिल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (ता.जिंतूर, जि.परभणी) येथे दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिंतूर येथे हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात आज दुपारपर्यंत कुठल्याही प्रकाराची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...