आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीसाठी युवा फुटबॉल खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यात १४ व १६ वर्षाखालील खेळाडू सहभागी होवू शकतात. ही चाचणी १९ ते २६ जूनदरम्यान राज्यातील तीन ठिकाणी घेतली जाणार आहे. निवडलेल्या खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण दिले जाईल आणि नवा संघ उभारण्यात येईल.
गुणवंतांना सुविधा मिळणार
युवा खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे. निवड झालेल्या सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत खेळाडूंना शासनाच्या अनेक सुविधा प्राप्त होतील. त्यामुळे अनेक खेळाडू क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड होण्यासाठी प्रयत्न करतात. क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाल्यानंतर खेळाडूंच्या पालकांचा मोठा आर्थिक भार कमी होतो. खेळाडूंना सुविधा मिळत असल्याने त्याचा ताण कमी होते आणि ते आपल्या खेळावर-सरावावर लक्ष्य केंद्रित करू शकतात. त्यांच्या शिक्षणाची, निवासाची, भोजनाची, प्रशिक्षणाची सोय शासनातर्फे मोफत करण्यात येते. इच्छुक खेळाडूंनी सकाळी ७ वाजेपूर्वी आपल्या सर्व कागदपत्रांसह चाचणीच्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक असल्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी कळवले आहे.
या ठिकाणी निवड चाचणी
पुणे विभाग व कोल्हापूर विभागातील खेळाडूंची निवड चाचणी पुण्यातील बालेवाडी संकुलात १९ व २० जून रोजी घेण्यात येईल. नाशिक विभाग व मुंबई विभागातील खेळाडूंची निवड चाचणी २१ व २२ जूनदरम्यान नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात होणार आहे. औरंगाबाद विभाग व लातूर विभागातील खेळाडूंची निवड चाचणी २३ व २४ जून रोजी औरंगाबादेतील विभागीय क्रीडा संकुलात घेतली जाईल. अमरावती विभाग व नागपूर विभागातील खेळाडूंची निवड चाचणी २५ व २६ जून रोजी अमरावती येथील नेहरू स्टेडियमवर होणार आहे. सर्व ठिकाणी चाचणीला सकाळी ७ वाजता सुरुवात होईल.
खेळाडूंसाठी थोडक्यात निकष
या चाचणीत सहभागी होणाऱ्या १४ वर्षाखालील खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी २००९ ते १ जानेवारी २०१३ दरम्यान असायला हवी. त्याचबरोबर, १६ वर्षांखालील खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी २००६ ते १ जानेवारी २००८ दरम्यानची असावी. १६ वर्षाखालील खेळाडूंची उंची १६५ सेमीच्यावर असायला हवी. निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची उंची, शारीरिक क्षमता, कौशल्य चाचणी व खेळातील कामगिरी पाहिली जाणार आहे. या निवड चाचणीसाठी खेळाडूंना प्रवास व जेवानाचा खर्च स्वत:ला करावा लागणार आहे. या वेळी आयोजकांतर्फे केवळ एक दिवसाची निवासाची व्यवस्था केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.