आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:कुत्र्यासोबत अमानवी वागणारा तरुण मध्य प्रदेशातून अटकेत, औरंगाबाद पोलिसांनी तीन राज्यांत संपर्क साधून घेतला शाेध

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका कुत्र्याचे पाय बांधून, पाण्यात टाकून त्याच्यावर दगड फेकून जिवे मारल्याचा अमानवी प्रकार करत त्याचा व्हिडिओ एका तरुणाने तयार केला हाेता. या अमानवी प्रकाराचा व्हिडिओ पाहता पाहता देशभर व्हायरल झाला. अाैरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी दोन दिवसांत या तरुणाचा शाेध लावून त्याला अटक केली.

३ राज्यांतील जवळपास ५० पेक्षा अधिक जणांशी संपर्क साधत, तांत्रिक तपासाच्या आधारे व्हिडिओतील आरोपीचा माग काढून आरोपीचा शाेध घेतला. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सनी बोरासी (२३) असे अाराेपीचे नाव अाहे. विशेष म्हणजे, व्हिडिओचा स्थानिक कुठलाही संबंध नसताना ग्रामीण पोलिसांनी तपासात पुढाकार घेत उज्जैन पोलिसांना घटनेची दखल घ्यायला भाग पाडून अाराेपीला अटक करवली.

एका कुत्र्याचे पाय बांधून तीन तरुणांनी तलावात फेकले. त्यानंतर वरून दगड मारत त्याला जिवानिशी मारले. पाहता पाहता फेसबुक, व्हाॅट्सअॅपवर हा व्हिडिओ व्हायरल झाला. आरोपींनी त्याचे चित्रण करून टिकटॉकवर तो प्रसारित केला. व्हायरल झाल्यानंतर ठिकठिकाणी संतापाची लाट उसळली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हा व्हिडिओ निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ त्याचे प्रसारण करणारे व बनवणाऱ्या व्यक्तींची माहिती घेण्याचे ग्रामीण सायबर पोलिसांना निर्देश दिले. त्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. यात हा व्हिडिओ टिकटॉकवरील असल्याने पोलिसांनी व्हायरल करणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचत विविध व्यक्तींकडून माहिती गोळा केली. दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश या तीन राज्यांतील व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांचा शोध घेत साखळी शोधून सनीचा माग काढला. डॉ. सिंघल यांनी तत्काळ उज्जैनच्या पोलिस अधीक्षकांशी संपर्क करून माहिती दिली. त्यात आरोपी उज्जैनचा असून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधल्याचे सांगत कारवाई करण्यास सांगितले. उज्जैन पोलिसांनी माधवनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सनीला अटक केली. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक घुगे, उपनिरीक्षक विवेक जाधव, हेड कॉन्स्टेबल कैलास कामटे, संदीप वरपे, रवींद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईन, सविता जायभाये, गजानन बनसोड, योगेश दारवंटे, लखन पाचोळे, रूपाली ठोले यांनी याप्रकरणी काम केले.

असा लागला शोध : व्हिडिओ देशभर झाला होता व्हायरल
व्हिडिओ प्राप्त झाला तेव्हा टिकटॉक आयडी अंधूक होता. त्यामुळे तो मूळ व्हिडिओ शोधण्याचे आव्हान होते. फेसबुक, ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या प्रत्येकाचा शोध घेत त्यांच्याशी संपर्क करणे पथकाने सुरू केले.
प्रत्येकाला व्हिडिओ प्राप्त झाल्याची लिंक विचारत तीन राज्यांतील ५४ जणांशी संपर्क केला. दिल्लीस्थित गजेंद्रसिंग याने सर्वप्रथम हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, जागरूकतेच्या उद्देशाने त्याने तो व्हायरल केल्याचे सांगितले.

  • गजेंद्रला हा व्हिडिओ उज्जैनमधील शान नावाच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर मिळाला हाेता. पथकाने त्या ग्रुपच्या अॅडमिनचा तपास केला.
  • एका महिलेने याबाबत ‘पेटा’कडे तक्रार केली हाेती. तिने व्हिडिओ दिल्याने टिकटॉक आयडीवरून आरोपीची प्राथमिक माहिती मिळाली.
  • अाराेपीच्या फेसबुक प्रोफाइल व इतर तांत्रिक तपासाच्या मदतीने तो व्हिडिओमधीलच असल्याचे सिद्ध झाले.
  • त्याआधारे परराज्यातील पोलिसांना घटनेची दखल घ्यायला लावून आरोपीदेखील अटक करून दिला.
बातम्या आणखी आहेत...