आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकतर्फी प्रेमातून दत्ता नाथाप्रसाद पवार (२३, रा. पांगरकरनगर, जालना) याने ओळखीच्या विवाहितेच्या पतीचे अपहरण करून दोन दिवस खोलीत डांबून ठेवले. लग्न करण्याची अट घालत त्याने विवाहितेला पतीचा खून करण्याची धमकी देत शहरात बोलावून घेतले. सातारा पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाताच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. मात्र, पळून जाण्याचा प्रयत्न करत त्याने पोलिसाच्या अंगावर गाडी घालून गंभीर जखमी केले. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून महिलेच्या पतीची सुटका केली. मंगळवारी सिडको चौक ते बीड बायपासदरम्यान हे नाट्य घडले.
मूळ नांदेडचे असलेले रवी (४८, नाव बदललेले आहे) कंपनीत व्यवस्थापक असून पत्नी नेहा (नाव बदललेले आहे) हे दोन मुलांसह राहतात. १९ जून रोजी सायंकाळी ते पत्नीच्या पार्लरचे सामान दुसरीकडे शिफ्ट करत होते. त्यांची पत्नी नेहा भावाचे लग्न असल्याने नांदेडला गेल्या होत्या. पूर्वी त्यांच्या परिसरात राहणारा दत्ता त्यांच्याकडे गेला. चहा पिण्याचा आग्रह करून त्यांना दुचाकीवर बसवून बळजबरीने सत्कर्मनगर येथून हॉटेल नंदिनीच्या मागील परिसरात नेले. एका घरासमोर दुचाकी थांबवून त्याने रवी यांना जबरदस्तीने घरात डांबून ठेवले. तू ओरडला तर तुझ्यासकट तुझ्या मुलांना, पत्नीला जिवे मारून टाकेल, अशी धमकी दिली. जिवाच्या भीतीने रवी शांत बसले. त्यानंतर त्याने रवी यांची पत्नीला कॉल केला. ‘तुझ्या पतीला किडनॅप केले आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू नकार देऊ नको व आताच मला भेटायला ये, नसता तुझ्या पतीला मारून टाकेल’ अशी धमकी दिली.
खाक्या दाखवताच खोली दाखवली : पोलिसांनी ताब्यात घेत त्याला ठाण्यात नेले तर धुळे यांना खासगी रुग्णालयात भरती केले. पोलिसांनी खाक्या दाखवताच दत्ताने रवी यांना कोंडून ठेवलेल्या खोलीचा पत्ता सांगितला. पोलिसांनी रवी यांची सुटका केली. सातारा पोलिस ठाण्यात दत्तावर गुन्हा दाखल करत सिडको पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात अाला.
नेहा यांनी सातारा पोलिस ठाण्यात निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्याकडे तक्रार केली. माळाळे यांनी उपनिरीक्षक शंकर शिरसाठ यांना महिलेच्या मदतीने दत्ताचा शोध घेऊन रवी यांची सुटका करण्याचे निर्देश दिले. शिरसाठ यांनी आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्याने ‘नेहा यांना नवरा हवा असेल तर सिडको चौकातील लेमन ट्री हॉटेलजवळ यावे, पोलिसांना सांगितले तर नवऱ्याला मारून टाकेल, तुला माझ्याशी लग्न करावे लागेल,’ अशी धमकी दिली. शिरसाठ यांनी सापळा रचून साध्या गणवेशात सिडको चौक गाठला. नेहा एकट्या उभ्या राहिल्या. दत्ता येताच त्यांनी इशारा केला व महिला हवालदार बागूल यांनी दत्ताची कॉलर पकडली. मात्र, त्याने बागूल यांचा हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने दुचाकी सुनील धुळे यांच्या अंगावर घातली. यात ते गंभीर जखमी झाले. मात्र, तरीही शिरसाठ व इतरांनी पाठलाग करून त्याला पकडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.